समन्वय बैठकीत महिलेने विष प्राषण करणेची धमकी दिल्याने खळबळ

वडूज : खटाव तालुक्यातील वडूज-डाळमोडी रस्त्याच्या कामास वडूज हद्दीतील निसळबेंद वस्तीवरील एका कुटुंबाने अडवणूक केल्यामुळे पाच गावातील विद्यार्थी व ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. महसूल प्रशासनाने या विषयावर तातडीने तोडगा काढावा याकरीता संबंधित गावातील विद्यार्थी व प्रमुख कार्यकत्यांनी तहसिलदार जयश्री आव्हाड यांना निवेदन दिले होते. या निवेदनाची गंभीर दखल घेवून तहसिलदारांच्या दालनात आपद्ग्रस्त गावातील प्रमुख कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकार्‍यांनी संबंधित कुटुंबियांसमवेत समन्वय बैठक आयोजित केली होती. या बैठकीत अडवणूक केलेल्या कुटुंबातील कुसुम जाधव या महिलेने प्रशासनाने रस्त्याच्या कामात आपल्या कुटुंबियांवर अन्याय केला आहे. तसेच आपले म्हणने न ऐकता दांडगावाने काम केल्यास विषारी औषध प्राषण करुन आत्महत्या करु. तसेच आपल्या आत्महत्येस तहसिलदारांसह बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील. असा इशरा दिल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, वडूज-डाळमोडी या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुरु आहे. या कामात निसळबेंद येथील अशोकराव जाधव, पांडुरंग जाधव, कुसुम जाधव, शोभा जाधव यांच्या कुटुंबियांनी आडकाठी आणली आहे. त्यामुळे सदर मार्गावरील सर्व एस.टी.बस फेर्‍या बंद झाल्या आहेत. त्याचा फटका शालेय विद्यार्थ्यांसह दैनंदिन कामासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांना बसत आहे. सदरच्या कुटुंबास अधिकारी व प्रमुख कार्यकत्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित कुटुंब कोणाचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे प्रमुख कार्यकत्यांसह रस्त्यावर काम करणारे मजूर, बांधकाम विभागाचे अधिकारी यांची वादावादी होत आहे.
यासंदर्भात तहसिलदार श्रीमती आव्हाड यांनी त्यांच्या दालनात समन्वय बैठक आयोजित केली होती. या बैठकीस मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता श्री. कदम, उपअभियंता श्री. भोसले, श्री. पानस्कर, श्री. कारंडे, विज वितरण कंपनीचे देसाई, नायब तहसिलदार कमलाकर भादुले, विजय काळे, विजय शिंदे, यमुना देशमुख, प्रसाद बागल, महादेव काशिद, विष्णूपंत निकम, आनंदराव घोरपडे, अमृत निंबाळकर, गजानन निकम उपस्थित होते. या बैठकीत चर्चा सुरु असतानाच रस्त्याचे काम करत असताना बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी पक्षपात केला आहे. फरशी पुलाच्या बांधकामामुळे आपल्या शेताचे नुकसान होत आहे. असे म्हणत जोरदार वादावादी केली. या वादावादीनंतर शेवटी सबंधित महिलेने आपले म्हणने ऐकले नाही तर विष प्राषण करुन आत्महत्या करु असा इशारा दिला. त्या महिलेच्या या इशार्‍यामुळे संपुर्ण प्रशासन अवाक झाले. त्यानंतर काही वेळाने मंडलाधिकारी, गांव कामगार तलाठी यांचे पथक संबंधित रस्त्याची समक्ष पाहणी करेल. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या विषयावर निर्णय घेवू असे सांगत तहसिलदारांनी बैठक थांबविली.