संतोषभाऊ जाधव यांचा भाजपात प्रवेश

सातारा: सातारा नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांसह सातारा आणि कोरेगाव विधानसभा मतदार संघ ताब्यात घ्या, त्यानंतरच मी पेढे स्विकारीन, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दरम्यान, निवडणूकांसाठी लागेल ती रसद, ताकद भाजपाकडून दिली जाईल असे सांगून अत्यंत संघर्षातून राजकारणात टिकून राहिलेल्या संतोषभाऊ जाधव यांच्या पाठीशी भाजपा खंबीरपणे उभे राहिल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. नितीन गडकरी, भाजपाचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ना. गिरीश बापट, माजी मंत्री एकनाथ खडसे, भाउसाहेब फुंडकर, कांताताई नलवडे, अतुल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, एखाद्या पक्षात प्रवेश केल्यानंतर संतोषभाऊसारख्या तरूण, तडफदार युवा नेता कोरेगाव विधानसभा मतदार संघातील आठ जागा निवडून आणूनही त्याला संघर्षमय राजकारण करावे लागते. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. सातारा-कोरेगाव मतदार संघातील प्रस्तापितांना चारी मुंड्या चित करून आजही युवकांचा आयडॉल म्हणून परिचित असणार्‍या संतोषभाऊ जाधव यांनी सातारा नगरपालिका, सातारा पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांसह सातारा आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात घ्यावेत, त्यासाठी लागेल ती रसद, ताकद संतोषभाऊ जाधव यांना दिली जाईल. भाजपाला आक्रमक आणि युवा चेहर्‍याची गरज होती. आज ती संतोषभाऊ यांच्या रूपाने पूर्ण झाली आहे. आज पक्षप्रवेश झाला आहे. आजपासूनच कामाला लागा.
 स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेतल्यानंतरच मी स्वतः पेढे खाण्यासाठी सातारला येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, संतोषभाऊ यांच्या पक्षप्रवेशानंतर आमदार नरेंद्र पाटील, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, भाजपचे जिल्हाअध्यक्ष विक्रम पावसकर, भारत पाटील, दत्ताजी थोरात, विजय काटवटे, विठठ्ल बरकडे यांनी दूरध्वनीवरून त्यांचे अभिनंदन केले.