साता-यात 28 जानेवारीला सातारा हिल सायक्लोथॉनचे आयोजन ; 55 कि.मी. आणि 15 कि.मी. अशा दोन विभागात होणार स्पर्धा

सातारा : यंग इन्स्पिरेशन चॅरिटेबल सोसायटी (कट्टा ग्रुप) यांच्यावतीने सातारा हाफ हिल मॅरेथॉनच्या धर्तीवर पश्‍चिम महाराष्ट्रात प्रथमच 28 जानेवारी 2018 ला सातारा हिल सायकलथॉनचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष मंगेश जाधव व सहका-यांनी पत्रकार परिषदेत दिली. सदर सायकलथॉन 55 किलोमीटर आणि 15 किलोमीटर अशा दोन विभागात होणार असून दोन्ही गटातील विजेत्यांना विविध आकर्षक बक्षीसही देण्यात येणार आहेत.
यंग इन्स्पिरेशन चॅरिटेबल सोसायटीने गेल्या सात वर्षात आतापर्यंत विविध सांस्कृतिक व क्रिडाविषयक स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्याच धर्तीवर पहिल्यांदाच सातारा हिल सायकलथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. 28 जानेवारीला पोलीस परेड मैदान येथून सकाळी 6 वाजता सुरुवात होणार असून 27 जानेवारीला एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सर्व स्पर्धकांना सायकलथॉन किटचे वाटप केले जाणार आहे. यावेळी सायकलशी संदर्भातील विविध साहित्याचे स्टॉल लावण्यात येणार आहेत.

ही स्पर्धा दोन विभागात घेतली जाणार असून मुख्य स्पर्धा ही 55 किलोमीटरची तर फन राईड ही 15 किलोमीटरची आहे. दोन्ही स्पर्धेची सुरुवात आणि शेवट हा सातारा पोलीस कवायत मैदानावर होणार आहे. मुख्य स्पर्धा ही पुरुष व महिला या दोन गटात होणार असून दोन्ही विभागात स्वतंत्र प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांकास अनुक्रमे 35 हजार, 25 हजार, 15 हजार रुपये रोख पारितोषिक, ट्रॉफी, मेडल व सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. तसेच इतर स्पर्धकांसाठी आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहेत. मुख्य हिल रेसमधील सहभागी सर्व स्पर्धकांना सायकल जर्सी, किट बॅग, बीब नंबर, टायमिंग चीप दिले जाणार आहेत. स्पर्धा पूर्ण करणा-या प्रत्येक स्पर्धकाला मेडल व ई सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.

फन सिटी राईडमधील सहभागी सर्व स्पर्धकांना टी शर्ट, किट बॅग, बीब नंबर दिले जातील व स्पर्धा पूर्ण करणा-या प्रत्येक स्पर्धकाला मेडल व ई सर्टिफिकेट देण्यात येईल. यात सहभागी होणा-या विद्याथर्यांना त्यांचे आयकार्ड दाखवल्यास रजिस्ट्रेशन फीमध्ये शंभर रुपयांची सवलत देण्यात येणार आहे. संपूर्ण स्पर्धा मार्गावर विविध ठिकाणी स्पर्धकांसाठी एनर्जी ड्रिंक, पाणी व मेडिकल तसेच सायकल रिपेअर किटची सोय केली जाणार आहे. नोंदणी ही ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारे ठेवण्यात आली असून ऑनलाईन नोंदणीसाठी  www.shcyclothon.com या वेबसाईटवर लिंक देण्यात आलेली आहे. तसेच ऑफलाईननोंदणीसाठी जाधव असोसिएट सदरबझार (02162-237626), प्रवीण मेडिकल राधिका रोड (02162-280506), पी.एस.शहा अ‍ॅन्ड कंपनी (8055380417), अनंत इंग्लिश स्कूलजवळ, आय.डी.इंडिया,(8421330204) जनता बँक शेजारी, शाहुपुरी येथे सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.

मुख्य स्पर्धेसाठी 1500 रुपये तर फन राईडसाठी 500 रुपये रजिस्ट्रेशन शुल्क आहे. मुख्य स्पर्धेसाठी 500 तर फन राईडसाठी 1000 स्पर्धक सहभागी होतील अशी अपेक्षा संयोजकांना आहे. सातारा जिल्हयाबाहेर जे स्पर्धक रजिस्ट्रेशन करणार आहेत त्यांच्यासाठी त्यांनी सांगितल्यास सायकल भाडेतत्वावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

मुख्य स्पर्धा 55 किलोमीटर असून 16 वर्षे व त्यापुढील स्पर्धक सहभागी होऊ शकतात. त्याचा मार्ग पोलीस कवायत मैदान, शिवाजी सर्कल, रयत शिक्षण संस्था, मुख्य कार्यालय, नगरपालिका, अदालतवाडा, समर्थ मंदिर, बोगदा, यवतेश्‍वर, गणेश खिंड, एकिव फाटा, एकिव गाव, साबळेवाडी, वेण्णानगर फाटा, मेढा रोड, कोंडवे, मोळाचा ओढा, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, जुने आर.टी.ओ. चौक, पोलीस कवायत मैदान. तर फनराईडसाठी 15 किलोमीटर असून 14 वर्षे व त्यापुढील स्पर्धक सहभागी होऊ शकतात. त्याचा मार्ग पोलीस कवायत मैदान, शिवाजी सर्कल, रयत शिक्षण संस्था, मुख्य कार्यालय, नगरपालिका, राजपथ मार्गे, कमानी हौद, राजवाडा बसस्थानक, गोल मारुती मंदिर, समर्थ मंदिर चौक, बोगदा, कुरणेश्‍वर मंदिर, सोनगाव फाटा, सातार पॉलिटेक्निक, खिंडवाडी कॅम्पस, नॅशनल हायवे सवर्हिस रोड, हॉटेल मराठ पॅलेस, गोडोली तळे, वायसी कॉलेज, पोवई नाका, पोलीस कवायत मैदान समाप्ती.

स्पर्धेच्या मार्गास महाराष्ट्र सायकल असोसिएशन परवानगी दिली असून वाहतुकीच्या दृष्टीने पोलिसांची परवानगी घेतली आहे. ज्यावेळेस ज्या भागातून मॅरेथॉन जाणार आहे त्याचवेळेस त्या भागातील वाहतुक बंद करण्यात येणार असल्याने नागरिकांना त्रासास सामोरे जावे लागणार नाही. प्रदुषणमुक्त साता-यासाठी आणि साता-याचे निसर्गसौंदर्याची माहिती होण्यासाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहनही संयोजकांनी यावेळी केले. यावेळी प्रवीण पाटील, सी.ए. प्रफुल्ल शहा, अ‍ॅड. सुनिल गंबरे, सचिन देशमुख, अलंकार जाधव, डॉ.तुषार पिसाळ, अ‍ॅड. रविंद्र क्षीरसागर, मंदार पोरे, कट्टा ग्रुपचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.