सातारा जिल्हा तालीम संघाच्या कुस्ती संकुल क्रीडा प्रबोधिनीच्या इमारतीचा 20 जानेवारी रोजी भूमीपूजन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विशेष कोट्यातून अडीच कोटीचा निधी
सातारा : तब्बल साठ वर्षाची परंपरा असणार्‍या सातारा शहरातील मध्यवर्ती सातारा जिल्हा तालीम संघाच्या कुस्ती संकुल क्रीडा प्रबोधिनीच्या इमारतीचा भूमीपूजन समारंभ दि 20 जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव जाधव यांच्या हस्ते होणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष कोट्यातून अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. याची माहिती तालीम संघाचे चेअरमन अमरदादा जाधव, व सचिव सुधीर पवार यांनी दिली. पवार पुढे म्हणाले, केवळ कुस्ती या क्रीडा प्रकारासाठी वाहिलेली क्रीडा प्रबोधिनी आंतरराष्ट्रीय धर्तीवर फकत सातार्‍यात जिल्हा तालीम संघाच्या तीन एकर मैदानावर होणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल नऊ कोटी रुपये खर्च येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा दौर्‍यावर असताना त्यांनी साहेबराव पवार यांच्या घराला भेट दिली होती. तेव्हा पितृतुल्य भाउंनी या क्रीडा प्रबोधिनीच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांकडे शब्द टाकला होता. मात्र क्रीडा विभागातून केवळ नऊ लाख रुपये देण्याची योजना होती .मात्र माजी जि. प. सदस्य व सातारा जावली विधानसभा मतदार संघाचे उमेदवार दीपक पवार यांनी पाठपुरावा करून अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. या प्रकल्पाची निविदा काढण्यात आली असून हे काम दीपक वसंत पाटील यांच्या फर्मला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून देण्यात आले आहे.
प्रेक्षागॅलरी आणि बरचं काही ……
तब्बल साडेदहा स्कवेअर फूट प्रशस्त कुस्ती संकुल असणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची मानके व सुविधांनी युक्त असणार्‍या प्रबोधिनीत लाल मातीचा आखाडा, रोप मल्लखांब, मॅट ,ग्रीको रोमन स्टाईल आखाडा, तसेच स्टीम व सोना बाथ इ सर्व सुविधा येथे देण्यात येणार आहे. या प्रबोधिनीचे नियंत्रण स्पोर्टस अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाकडून होणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला तालीम संघाचे संचालक विलासकाका उंडाळकर, आमदार शंभूराजे देसाई, हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे कोल्हापूर, हिंदकेसरी दीनानाथ सिंह कोल्हापूर, हिंदकेसरी दादू चौगुले कोल्हापूर, हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेस तालीम संघाचे उपाध्यक्ष संदीप साळुंखे, खजिनदार बलभीम शिंगरे, संचालक जीवन कापले , सूर्यकांत पवार, उपमहाराष्ट्र केसरी चंद्रकांत सूळ, यशवंत चव्हाणं, वैभव फडतरे संपतराव साबळे, इं उपस्थित होते . नव्या संकुलाच्या बांधणीसाठी तालीम संघाची जुनी इमारत पाडण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली. लोकनेते बाळासाहेब देसाई, यांच्या पुढाकाराने श्रीरंग अप्पा पैलवान, धोंडिराम शिंगरे यांच्या सहकार्याने एक लाख रुपये खर्च करून पक्की दगडी इमारत बांधण्यात आली होती. सहा दशकाचा इतिहास सांगणार्‍या या दगडी इमारतीला पाडले जात असताना साहेबराव पवार उर्फ भाऊ यांचे डोळे मात्र पाणावले होते.