दाभोळकर आणि त्यांच्या न्यासावर झालेल्या आरोपांचा विचार करूनच अंतिम निर्णय घेऊ : नगराध्यक्षा कदम

सातारा : सातारा नगरपालिकेच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नावे देण्यात येणारा स्मृती पुरस्कार रहित करण्यात यावा, यासाठी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने नगराध्यक्षा माधवी कदम यांची भेट घेण्यात आली.
या विषयीचे निवेदन नगराध्यक्षा माधवी कदम याना आणि मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या नावे प्रसाशकीय अधिकारी राजेश काळे यांना देण्यात आले. नगराध्यक्षा सौ. कदम म्हणाल्या, हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी उपस्थित केलेले मुद्दे पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत मांडण्यात येतील. डॉ. दाभोलकर आणि त्यांच्या न्यासावर झालेल्या आरोपांचा विचार करून मगच पुरस्काराविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल.
यावेळी वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज, पू. गगनगिरी महाराज संप्रदायाचे दादा महाराज कुंभार, विश्‍व हिंदु परिषदेचे शहरमंत्री जितेंद्र वाडेकर, शिवसेनेचे शैलेंद्र सावंत, हिंदू एकता आंदोलनाचे दिपक लोकरे, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अमोल मोरे, माजी नगरसेविका लीलावती निंबाळकर आणि हिंदु जनजागृती समितीचे हेमंत सोनवणे यांसह अनेक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.