सातारच्या हद्दवाढीचा प्रश्‍न अंतीम टप्प्यात

शासनाकडून उद्घोषणा; नगराध्यक्षा माधवी कदम व उपनगराध्यक्ष राजु भोसले यांची संयुक्त पत्रकाव्दारे माहिती
सातारा: सातारा नगरपरिषदेच्या हद्दवाढीची उद्घोषणा शासनाने केली असून, सुमारे 1977 सालापासूनचा रखडलेला सातारच्या हद्दवाढीचा प्रश्‍न मार्गी लागला आहे, सातारच्या हद्दवाढीची घोषणा म्हणजे सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार यांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांचे यश आहे, असे मत सातारा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.माधवी संजोग कदम आणि उपनगराध्यक्ष
राजु भोसले यांनी एका संयुक्त पत्रकाव्दारे व्यक्त केले आहे.
या प्रसिध्दीपत्रकात नगराध्यक्षा आणि उपनगराध्यक्ष यांनी पुढे नमुद केले आहे की, सातारा शहराची 1977 सालापासून हद्दवाढीचे वेळोवेळी केलेले प्रयत्न निष्प्रभ ठरले होते, तथापि खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी, सातारा शहरावर तरंगत्या लोकसंख्येचा पडणारा ताण, सातारा शहराची सर्वांगिण प्रगती, हद्दवाढ झाल्याशिवाय होणार नाही हे सत्यमर्म जाणुन घेवून, नेमके प्रयत्न केले. यासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण, विद्यमान मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, यांच्याशी त्यांचा हद्दवाढ या विषयावर सातत्याने संपर्क होता व पाठपुरावा होता. खा. श्री.छ.उदयनराजे भोसले यांच्याच सुचनेवरुन तत्कालीन उपाध्यक्ष रवि साळुंखे यांनी जिल्हापरिषदेचा हद्दवाढीस अनुकूल असणारा ठराव पारित करुन घेतला होता. जिल्हा परिषदेचा अनुकूल ठराव करुन घेणे अनेक वर्षात कुणाला जमले नव्हते ते खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांच्यामुळे शक्य झाले.
जिल्हा परिषदेचा अनुकूल ठराव झाल्याने हद्दवाढीविषयीच्या सर्व शंका दूर झाल्या होत्या. तसेच  नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वी ना.देवेंद्र फडणवीस यांनी सातारच्या हद्दवाढीवर निर्णय घेतो असे ठोस आश्‍वासन खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांना दिले होते.
या पार्श्‍वभुमीवर शासनाने आज दि.22 मार्च रोजी हद्दवाढीची नेमकी दिशा स्पष्ट करुन, उद्घोषणा केली आहे.
उद्घोषणेची माहिती याच कामासाठी मंत्रालयात उपस्थित असलेल्या नगरसेवक अ‍ॅड.डि.जी.बनकर आणि नगरपरिषदचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिली.

 

उद्घोषणा झाल्याने, हद्दवाढीचा प्रश्‍न आता पुढील महिन्याभरात पूर्णपणे मार्गी लागला जावून, शहराची पूर्वेकडील नवीन राष्ट्रीय महामार्गाच्या आतील सर्व भाग, पश्‍चिमेकडील यवतेश्‍वर डोंगराच्या पायथ्यापर्यंतचा सर्व भाग आणि सर्वें नंबर, तसेच उत्तरेकडे वेण्णा नदी पर्यंतचे सर्वेनंबर आणि दक्षिणेकडे अजिंक्यतारा डोंगरासह, नवीन राष्ट्रीय महामार्गाच्या आतील भागाचा समावेश होणार आहे. याबाबत तीस दिवसाच्या आत हरकती दाखल करण्याचेही आवाहन उद्घोषणेत करण्यात आले असून, या हरकतींचा योग्य तो विचार करुन, हद्दवाढीला अंतिम स्वरुप प्राप्त होईल आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे हे फार मोठे यश आहे असेही नगराध्यक्षा माधवी कदम आणि उपनगराध्यक्ष राजु भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकात शेवटी नमुद केले आहे.