उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्यासह सर्व सभापतींना मुदतवाढ

खा. उदयनराजेंनी दिला सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का
सातारा : धक्कादायक तंत्रासाठी प्रसिद्ध असणार्‍या खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सोमवारी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. लोकसभा निवडणुकांच्या पाश्वभूमीवर उदयनराजे यांनी पालिकेच्या कमिटी हॉलमध्ये कमराबंद खलबते केली. उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्यासह सर्वच सभापतींना मुदतवाढ देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. उदयनराजे यांच्या निर्णयाचे आघाडीत संमिश्र स्वागत झाले.
विद्यमानांनी खुशीतं गाजरे खाल्ली तर इच्छुकांचा चेहरे मात्र बघण्यासारखे झाले होते. खा. उदयनराजे भोसले यांनी सकाळी 9.30 वाजताच कमिटी हॉलमध्ये बैठक मारत पहिल्या दहाच मिनिटात आपला अजेंडा स्पष्ट केला आहे त्या विद्यमान सभापती ना मुदतवाढ देण्याचे उदयनराजे यांनी जाहीर करत सगळ्या राजकीय उत्सुकतेची हवाच काढून टाकली. उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, बांधकाम सभापती मनोज शेंडे, पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, आरोग्य सभापती यदुनाथ नारकर, नियोजन सभापती स्नेहा नलावडे, महिला व बालकल्याण सभापती अनिता घोरपडे, यांनाच पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. अगदी समिती सदस्य सुध्दा तेच कायम ठेवण्यात आले. केवळ स्थायी समितीच्या सदस्यपदी शेखर मोरे यांच्या ऐवजी बाळासाहेब खंदारे यांची निवड झाली. लोकसभेची आचारसंहिता आता जवळ आली आहे. सदस्य बदल यांचा कोणताही खर्च आता पालिकेला नको ज्याला यायचे तो येईल ज्याला ज्यायचे तो जाईल अशी राजकीय गुगली उदयनराजे यांनी टाकत चला बनकर साहेब या सर्वांचे फॉर्म भरून घ्या असा आदेश दिला. फॉर्म भरण्याची सकाळी 11 ते अडीच या दरम्यान सर्वांचे फॉर्म पीठासन अधिकारी तहसीलदार नील प्रसाद चव्हाण यांच्याकडे भरण्यात आले.
नामनिर्देशन पत्र भरणे त्याची माहिती सदस्यांना देणे, 12. 30 वाजता छाननी त्यानंतर दीड वाजता अर्ज माघारी, आणि सव्वादोन वाजता सभापतींची घोषणा या प्रक्रिया करण्यात आल्या. सर्व सभापतींचे उदयनराजे भोसले व नगराध्यक्ष माधवी कदम, आघाडी सचिव अ‍ॅड दत्ता बनकर, पक्षप्रतोद निशांत पाटील, सभागृह नेत्या स्मिता घोडके यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.