किल्ले अजिंक्यताऱयावर उद्या सातारा स्वाभिमान दिवस

दोन्ही राजेंसह सातारकर करणार अभिवादन
सातारा : किल्ले अजिंक्यताऱयावर उद्या 12 जानेवारीला स्वाभिमान दिवस साजरा होत आहे. त्याकरिता गेल्या आठ दिवसांपासून अजिंक्यताऱयावर राजसदरेवर श्रमदान केले जात आहे. स्वाभिमान दिवसाच्या उत्सावाचे नियोजन केले असून खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले या दोघांच्या उपस्थितीत सकाळी 8 वाजता किल्ले अजिंक्यताऱयावर स्वाभिमान दिवसाच्या सोहळयास सुरवात होणार आहे, अशी माहिती शिवराज्यभिषेक उत्सव समितीचे संस्थापक सुदामदादा गायकवाड यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
यावर्षी स्वाभिमान दिनाकरिता गोडोली येथील ग्रामसेवक भवनात शिवभक्तांची बैठक पार पडली. जसे नियोजनात ठरले त्यानुसार दररोज सकाळी किल्ले अजिंक्यताऱयावर गेले आठ दिवस श्रमदानाची मोहीम सुरु आहे. संपूर्ण राजसदरेचा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. स्वाभिमान दिवस सोहळयाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. 12 रोजी सकाळी 8 वाजता किल्ले अजिंक्यतारा येथे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत स्वाभिमान दिवस सोहळयाला सुरुवात होणार आहे. मराठयांच्या राजधानीमध्ये आपण राहतो. हिंदुस्थानाच्या इतिहासात सर्वात मोठा राज्यविस्तार झाला. तो म्हणजे मराठयांचे अटकेपार झेंडे फडकले. हाच आदेश किल्ले अजिंक्यताऱयावरुन देण्यात आला. राजधानी साता़र्‍याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू छत्रपती संभाजी महाराज यांचे सुपूत्र शाहू महाराज यांचा राज्यभिषेक झाला तो दिवस म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचा जन्मदिवस. हिंदुस्थानचे जसे 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे महत्व, 1 मे ला महाराष्ट्र दिनाचे महत्व, तसेच 12 जानेवारीला सातारा स्वाभिमान दिनाचे महत्त्व आहे.
स्वाभिमान दिवस सोहळयाच्या निमित्ताने ही एक चळवळ सुरु रहावी हा उद्देश ठेवून राजसदरेवर कायम स्वरुपी प्रतिमा ठेवण्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी मंडप तसेच शामियाना उभारणी करण्यात येणार आहे. सर्व वातावरण किल्ले अजिंक्यताऱयावर भगवे असे साकारण्यात येणार आहे. त्याकरिता गेल्या आठ दिवसांपासून साताऱयातील युवकांकडून झोकून देवून काम केले जात आहे. त्यामुळे सातारकरांनीही या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवराज्यभिषेक उत्सव समितीचे सुदामदादा गायकवाड यांनी केले आहे…