अविश्‍वास ठरावाचे हत्यार राष्ट्रवादीवर उलटणार?

कृषी सभापती शिवाजी शिंदे यांची जोरदार फिल्डींग
सातारा : राष्ट्रवादीच्या तंबूत सध्या घडलंय-बिघडलंय याचे प्रत्यंतर येत असून पक्षश्रेष्ठी विरुध्द कार्यकर्ता हा संघर्ष शमेनासा झाला आहे. कृषी सभापती यांच्या विरोधात अविश्‍वासाचा ठराव मांडणारी विशेष सभा येत्या 30 जुलै रोजी होत आहे. मात्र शिंदेंना या कारवाईची प्रचंड सहानुभूती मिळत असून शिंदेंनी सुध्दा जोरदार राजकीय ताकद लावल्याने अविश्‍वास ठरावासाठी लागणारे 44 ची संख्याबळ राष्ट्रवादी कशी गाठणार हा खरा कळीचा मुद्दा आहे. बहुतांश जिल्हा परिषद सदस्यांनी शिंदे यांना आतून पाठिंबा देण्याचा गोपनीय घाट रचल्याने राष्ट्रवादीच कोंडीत पकडली जाण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीपासून माण विरुध्द फलटण असा जोरदार राजकीय सामना राष्ट्रवादीच्या आखाड्यात सुरु झाला आहे. गत अडीच वर्षात राजीनामा मागितलेला असतानाही शिवाजी शिंदे यांनी तो न देता एककल्ली काम करुन पक्ष नेतृत्वालाच आव्हान दिल्याचा राग राष्ट्रवादीच्या नेते मंडळींच्या मनात सलत आहे. मात्र या विरोधात शिंदे यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावून राष्ट्रवादीच्या घडाळ्याचे काटे उलटे फिरवले होते. त्यामुळे कसेही करुन शिवाजी शिंदे यांना पदच्युत करायचेच कसे मनसुबे रचले गेल्याने शिंदेंनी सुध्दा आखाड्यात उतरण्याची पुरेपूर तयारी केली आहे. येत्या 30 तारखेला होणार्‍या विशेष सभेसाठी राष्ट्रवादीने सर्व सदस्यांना व्हीप बजावल्याची चर्चा असून याची पत्रे सुध्दा त्यांना रवाना झाली आहेत. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे 39 तर काँग्रेसचे 21 सदस्य आहेत. याशिवाय विलासकाका उंडाळकर, जावली विकास आघाडी व पाटण विकास आघाडी असे मिळून स्वतंत्र 7 सदस्यांचा गट आहे. अविश्‍वासाच्या ठरावासाठी 44 सदस्यांचा पाठिंबा मिळणे आवश्यक आहे. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या राजकीय प्रभावामुळे तो मिळवला जाईलही मात्र प्रत्यक्षात वारे उलटे वाहत असल्याची चिन्हे असून कार्यकर्त्यांना बळ देण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करण्याची राष्ट्रवादीची रणनिती पदाधिकार्‍यांना जाचू लागली आहे त्यामुळे खाजगीतच शिवाजी शिंदेंना राजकीय बळ देण्याचा प्रयत्न होवू शकतो. त्यात खा. उदयनराजे भोसले यांचा गट काय भूमिका घेणार हे अजून उघड झालेले नाही. उदयनराजे सांगतील त्या पध्दतीनेच जर राजकीय खेळी झाली तर राष्ट्रवादीच अडचणीत येवू शकते. रामराजे विरुध्द उदयनराजे हा शाब्दिक खडाजंगीचा सामना राष्ट्रवादीने मोठ्या निकराने संपवला होता. आता राष्ट्रवादीला पुन्हा कोंडीत पकडण्यासाठी ही नामी संधी असून त्याचा लाभ उठवला जाण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसने सुध्दा या सत्तेच्या राजकारणात राष्ट्रवादीकडून नेहमीच विश्‍वासघाताचा अनुभव घेतला. आणि आता तर राष्ट्रवादीच्या तंबूतच कार्यकर्ते विरुध्द पक्षश्रेष्ठी असा सामना सुरु झाला आहे. त्यामुळे विरोधातल्या घटनांना त्यांच्याकडूनही राजकीय बळ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पडद्याआडून तशाच राजकीय हालचाली सध्या तरी सुरु झाल्याचे वृत्त आहे.