उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरेंवर फौजदारी गुन्हा दाखल करा

खा. उदयनराजे समर्थकांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी
सातारा : सातारा जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे हे राजकीय विधान शांतताभंग करून खा. श्री. छ. उदयनराजे, आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे या दोघांमध्ये वाद घडवून आणत आहेत. मानकुमरे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी उदयनराजे प्रेमी युवकांनी जिल्हा पोलीस अधिक्षक पकंज देशमुख यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, जावली पंचायत समिती सभापती निवडीवेळी जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी जावलीत उदयनराजेंचे काही चालत नाही, फक्त शिवेंद्रसिंहराजेंचे चालते. असे वादग्रस्त वक्तव्य करून दोन्ही राजेंमध्ये राजकीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनाजी पंताची भुमिका बजावून दोन्ही राजेंमध्ये फुट पाडण्याची भुमिका बजावत जिल्ह्यात शांतताभंग करण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रसिध्दी मिळविण्यासाठी अशा बोलण्याने दोन्ही राजेंपेक्षा मानकुमरे यांचेच चालते असे त्यांनी सभापती निवडीवेळी दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मानकुमरे यांच्या अशा वादग्रस्त विधानांमुळे सहाजीकच दोन्ही राजेंमध्ये पुन्हा ठिणगी पडून वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वसंतराव मानकुमरेंच्या स्वार्थी वक्तव्यामुळे पुन्हा सातारा शांतताभंग होण्याची चिन्हे दिसत आहेत. तरी मानकुमरे यांच्या वक्तव्याची दखल गांभीर्याने जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांनी घेवून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी उदयनराजेप्रेमी किरण कुराडे, विवेक येवले, हर्षल माने, राजेश कांबळे, संदिप शिंदे, रोहित किर्दत, नितीन काळे, सनी साबळे, निखील प्रभाळे यांनी केली आहे.