वि. ग. सातपुते यांनी जागवल्या सातारच्या आठवणी ; संत आठवणी व कवीतांचे सुरेख सादरीकरण

सातारा (अतुल देशपांडे) : राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचे शिष्य श्रीधर स्वामी यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या सातारा शहर व परिसर हा खरोखरच एकवेगळी अनुभूती देणारा आहे. या संतांच्या कल्याणकारी स्पर्शाने येथील नागरिक खरोखरच धन्य आहेत असे उद्गार ज्येष्ठ साहित्यीक व संत चित्रकार वि. ग. सातपुते यांनी काढले.
सातारा येथील लायन्स कल्ब गेंडामाळ, दिपलक्ष्मी नागरी स. पतसंस्था व महालक्ष्मी स. पतसंस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संतांच्या कल्याणकारी स्पर्श आणि काव्य वाचन कार्यक्रमात सातारच्या हृद्य आठवणी कार्यक्रमात सातपुते बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक परिवहन अधिकारी योगेश बाग उपस्थित होते. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रकाश गवळी, साविआचे पक्षप्रत्तोद अ‍ॅड. दत्ता बनकर, दिपलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस, गेंडामाळ लायन्स कल्बचे अध्यक्ष विनायक भोसले यांची प्रमुख उपस्थिती होते. यावेळी सातपुते यांनी आपल्या काव्यावाचन कार्यक्रमात आई, वेदना मखमली, भास मुक्तीचा, पूर्वसंचीत, ध्यास या कवीता सादर केल्या तसेच सातारच्या आठवणी सांगताना जुन्या काळातील मात्र ज्यांनी नावे आजही मोठ्या अभिमानाने घेतली जातात असे माजी नगराध्यक्ष भाऊकाका (बन्याबापू) गोडबोले, कोंडीराम गवळी सावकार, दै. ग्रामोध्दारचे संस्थापक भाऊसाहेब उर्फ रा. बा. जाधव, क्रांतीस्मृती विद्यालयाचे विठ्ठलराव सोमण,न्यू इंग्लिश स्कूलचे माजी शालाप्रमुख दा. सी. देसाई आदींची विस्तृत माहिती उपस्थितांना करुन दिली.
या कार्यक्रमाला श्री. सातपुते यांच्या व्दारे काढण्यात आलेल्या विविध संतांच्या चित्रांचे मनमोहक व आकर्षक असे भव्य प्रदर्शन संत चित्रे या मथळ्याखाली शुक्रवारी दिपलक्ष्मी हॉल येथे आयोजित करण्यात आले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी सातारकर नागरिकांनी दिवसभर गर्दी केली होती. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी लोकमंगल गु्रप शिक्षण संस्था तसेच अख़िल भारतीय मराठी नाट्य परिषद सातारा शाखा यांचे विशेष सहकार्य लाभले. समारंभास दै. ग्रामोध्दारचे संपादक बापूसाहेब जाधव, ज्येष्ठ उद्योजक धनराज लाहोटी, श्रीकांत दिवशीकर यांच्यासह दिपलक्ष्मी व महालक्ष्मी पतसंस्थेचे संचालक, कर्मचारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
म. वि. सातपुते यांनी दै. ग्रामोध्दारचे संस्थापक संपादक व सातारचे माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब उर्फ रा. बा. जाधव यांच्या बद्दल आठवणींना उजाळा दिला. सातारा येथे अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून सुरु केलेले दै. ग्रामोध्दारच्या संपादनाचे काम आणि त्यानंतर नगरपालिकेच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाची भुषवलेली संस्मरणीय कामगिरी याची ओळख व आठवण आपल्या मनावर कायमस्वरुपी कोरली गेल्याचे आवर्जून सांगितले