सेवागिरी कृषी प्रदर्शन तयारी अंतिम टप्प्यात ; श्वान ओढणार 1 टनाची गाडी ; 100 किलोचा पंजाबी बोकड खास आकर्षण  

पुसेगाव : श्री सेवागिरी महाराजांच्या 70 व्या पुण्यस्मरणानिमित्त राज्यस्तरीय सेवागिरी कृषी व पशूपक्षी प्रदर्शन शनिवार दि. 16 ते बुधवार दि. 20 डिसेंबर 2017 या दरम्यान आयोजित केले आहे. या प्रदर्शनात फायरचे स्टॉल उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यंदाच्या प्रदर्शनात शेतीविषयक प्रक्रिया, पशू पक्षी प्रदर्शन, डॉग शो, दुर्मिळ देशी 300 हून अधिक बियाण्यांचे प्रदर्शन व विक्री, तांदूळ महोत्सव,  जलयुक्त यासह नामांकित कंपन्या, शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल व यंत्रसामुग्रीसह विविध 250 स्टॉल सहभागी होणार आहेत.
श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व स्मार्ट एक्स्पो यांच्या संयुक्त विद्यमाने पुसेगाव येथे राज्यस्तरीय सेवागिरी कृषी व पशूपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीच्या प्रदर्शनची तयारी सध्या वेगाने सुरु आहे. प्रदर्शन स्थळावर शामायिना डोममध्ये फायबरचे स्टॉल उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रदर्शनात नामंकित कंपन्यांची बहुपयोगी स्टॉल निमंत्रीत करण्यात आले आहेत. 250 स्टॉलची नोंदणीही पुर्ण झाली आहे. या विभागातील जमीन अतिशय सुपीक असून पर्जन्यमान चांगले असल्याने शेती व्यवसायाच्या विकासास मोठा वाव आहे. या प्रदर्शनामध्ये मुख्यता शेतीविषयक प्रक्रिया, आधुनिक शेती विकासावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय यंदाच्या कृषी प्रदर्शनात शेतीचा बदलता चेहरा, पीक पध्दतीतील नवनवे बदल, खते आणि पाणी व्यवस्थापनातील बदल, ऋतुमानानुसार निर्माण झालेली आव्हाने, शेती मालाची बाजारपेठ, अ‍ॅक्वॉकल्चर, औषधे, बायोटेक्नॉलॉजी, बि-बियाणे, टिश्यु कल्चर, औजारे, पाणी व्यवस्थापन, ऑटोफार्मिंग टेक्नॉलॉजी, ट्रॅक्टर्स, सौरउर्जा, इक्विपमेंटस, पशूखाद्य व औषधे, सिंचन साधे, डेअरी इक्विपमेंटस, फलोत्पादन, पोल्ट्री सोल्युशन, पॅकेजिंग, कृषी अर्थसहाय्य, साठवणूक, लोबजेट हाऊसिंग सोल्युशन, शासकीय विविध विभाग, कृषीविषयक पुस्तके, नियतकालिके, प्रक्रिया उद्योग या सर्व क्षेत्रांचे अंतरंग उलगडून दाखविणारे नामांकित कंपन्याचे स्टॉल सहभागी होणार आहेत.
या भागातील शेतकरी बटाटा व आल्याचे पिक काढत असताना रासायनिक खतांचा वापर करतात. तो टाळून सेंद्रीय व जैविक पध्दतीने शेती कशी करावी, याकडे लक्ष केंद्रित केली जाणार आहे. सध्या मजूरांची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असल्याने छोट्या-मोठ्या कृषी औजारे घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल आहे. खिल्लार जनावरांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनात शेती विषयक नवनवीन माहिती मिळावी, याकरीता ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना याचा लाभ घ्यावा, असे आवहान श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव व सर्व विश्वस्तांनी केली आहे.
गतवर्षीप्रमाणे कृषी प्रदर्शन पुर्णत: बंदिस्त असणार आहे. प्रदर्शनस्थळी संपुर्ण मॅट टाकले जाणार आहे. या प्रदशर्नामध्ये श्वान ओढणार 1 टनाची गाडी, 100 किलोचा पंजाबी बोकड खास आकर्षण असणार आहे. याशिवाय नर्सरी, विदेशी भाजीपाला यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे यंदाच्या कृषी प्रदर्शनाची मांडणी आणि सजावटीबद्दल शेतकरी वर्गामध्ये उत्सुकता लागून आहे.