सेवागिरी यात्रेस झेंडा मिरवणुकीने प्रारंभ

खटाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणार्‍या पुसेगाव ता. खटाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या वार्षिक यात्रेची सुरुवात श्री सेवागिरी महाराजांच्या पालखी व झेंड्याच्या मिरवणूकीने झाली. श्री सेवागिरी महाराज की जय, ओम नमो नारायणाच्या जयघोषात, ढोल-ताशा, लेझीम, झांजपथक व बॅण्डपथकाच्या निनादात भक्तिमय व उत्साही वातावरणात यात्रेस प्रारंभ झाला.
श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्‍वस्त मोहनराव जाधव, योगेश देशमुख, रणधीर जाधव, सुरेशशेठ जाधव, सरपंच दीपाली मुळे, माजी उपसरपंच संतोष  जाधव यांच्याहस्ते मंगळवारी सकाळी 9 वा. श्री सेवागिरी महाराजांच्या पादुका, पालखी व मानाच्या झेंडाचे विधीवत पूजन केल्यानंतर झेंडा मिरवणूकीस प्रारंभ झाला.
या मिरवणूकीसमोर श्री हनुमानगिरी हायस्कूल, श्री सेवागिरी विद्यालय, इंदिरा गांधी कन्या प्रशाला, डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मिडीयम स्कूल, शासकीय विद्या निकेतन या शाळांचे विद्यार्थी झांजपथक व लेझीम पथके सहभागी झाली होती. यावेळी काही विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून श्री सेवागिरी मंदिर व छत्रपती शिवाजी चौकात आकर्षक पध्दतीने लेझीम व झांजपथकाचे प्रकार सादर केले.
डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ऐरोबिक्सचे सादरीकरण केले. श्री सेवागिरी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकसारखे पोशाख परिधान करुन ढोल व ताशांच्या तालावर झांजपथक लेझीमचे सादर केलेले कार्यक्रम लक्षवेधक ठरले. श्री सेवागिरी महाराजांच्या मानाचा झेंडा व पालखीचे मोठ्या श्रध्देने भाविक दर्शन घेत होते. यात्रास्थळावर श्री सेवागिरी महाराजांच्या मानाच्या झेंड्याची प्रतिष्ठापना मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.ही मिरवणूक सुमारे तीन तास सुरु होती. श्री सेवागिरी महाराजांच्या झेंडा मिरवणूकीदरम्यान वाहतूककोंडी होवू नये, यासाठी पुसेगाव पोलीस ठाण्याचे सपोनि संभाजी गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.