स्व. यशवंतराव, किसनवीर आबांच्या विचारांचा राजकीय दुवा निखळला : खा. शरद पवार

सातारा : स्व. यशवंतराव चव्हाण आणि किसनवीर आबा यांच्या विचाराने समाजाला मार्गदर्शन व काम करणारा जुन्या पिढीतील राजकीय दुवा निखळला आहे. लक्ष्मण तात्यांनी गाव पातळीपासून राजकारणाला सुरूवात केली. गाव, जिल्हा परीषद ते संसद असा राजकीय प्रवास त्यांनी यशस्वीपणे केला, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सातार्‍यात पत्रकारांशी बोलताना काढले.
दरम्यान शरद पवार यांनी पक्षाचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या सातारा विकासनगर येथील निवासस्थानी सायंकाळी 6 वाजता त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून अभिवादन केले. यानंतर शरद पवार यांनी तात्यांचे जेष्ठ चिरंजीव मिलींद पाटील, आ. मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील यांचे सांत्वन केले. यावेळी विधानपरीषदेचे सभातपी ना. रामराजे नाईक-निंबाळकर, आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. बाळासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे संचालक दादाराजे खर्डेकर यांच्यासह जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांनी तात्यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली वाहिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे आज गुरूवारी मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान निधन झाले. ही वार्ता कळल्यानंतर सातारा जिल्ह्यात शोकळा पसरली. त्यानंतर माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या अंतीम अंत्यदर्शनासाठी खा. शरद पवार हे खास हेलिकॅप्टरने कार्यक्रम अर्धवट सोडून सातार्‍यात आले होते, त्यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेत ते पत्रकारांशी बोलत होते.
खा. शरद पवार पुढे म्हणाले, बोपेगाव ते नवी दिल्ली संसद असा राजकीय प्रवासात लक्ष्मणराव पाटील यांनी सर्वसामान्य माणसांचे हित जोपासण्याचे हित आयुष्यभर समोर ठेवले होते. तात्यांबरोबर आम्ही जुन्या पिढीतील स्व. किसनवीर आबांचे राजकारण पाहिले आहे. किसनवीर आबा काम करताना चौकटीच्या बाहेर जावून कोणतीही भुमिका घेत नव्हते. चौकटीच्या बाहेर काम करणार्‍या कार्यकर्त्याला जागेवरच सडेतोडपणे रोखण्याचे काम किसनवीर आबांनी केले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली लक्ष्मणराव तात्यांची वाटचाल सुरू राहिली होती. तात्यांनी शेवटपर्यंत कधीही चौकटीच्या बाहेर जावून भुमिका घेतली नाही. स्व. यशवंतराव चव्हाणांच्या विचारांनी संघटना बांधणीचे काम केले. किसनवीर आबांच्या मार्गदर्शनाखाली अनेकजण तयार झाले. त्यामध्ये वरच्या पातळीवर यशस्वीपणे लक्ष्मणराव पाटील यांचे नाव घेतले जाते. तात्यांनी स्व. चव्हाण आणि आबांचे विचार पुढे चालविला. आबांच्या नंतर स्वच्छ कारभार, आणि स्पष्टपणे धडाडीने निर्णय घेण्याचा कित्ता तात्यांनी आयुष्यभर गिरवला.
सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाचे काम करताना सहकार्‍यांना बरोबर घेवून काम करत मार्गदर्शनही केले. असा विचारांची असलेली व्यक्ती जिल्ह्याच्या व पक्षाच्या राजकारणा मार्गदर्शनाचा एक ठेवा होता. असा नेता आपल्यातून निघून गेले. त्यामुळे पक्षात एक पोकळी निर्माण झाली आहे. तात्या मलाही ते वरीष्ठ होते. माझ्या बर्‍या, वाईट काळात माझ्याबरोबर रोखठोक भुमिका घेवून पाठीशी उभे होते. भुमिका घेताना अनेकदा त्यांनी तडजोडीची भुमिकाही बजावली आहे. त्यांच्या जाण्याने आमचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने काम करणारे म्हणून लक्ष्मणराव तात्यांकडे आधारवडफ म्हणून पाहिले जाते. तो आधारवडफ आपल्यात राहिला नाही. याचे दुख: माझ्यासह जिल्ह्यातील सर्व सहकार्‍यांना वाटत आहे. संस्था कशी चालवायची? याचे मार्गदर्शन तात्यांचे मोलाचे राहीले आहे. मग सहकारी बँक, असो अथवा किसनवीर सहकारी कारखाना, या सहकारी संस्था चालविण्याचा आदर्श त्यांनी आमच्यासमोर ठेवला आहे. तसेच जिल्हा परीषदेमध्ये अध्यक्ष म्हणून काम करताना चांगले प्रशासन दिले. संसदेत ते फारसे बोलले नसले तरी राज्याच्या संबधातील प्रश्‍न सोडवून घेण्यासाठी तात्यांनी धाडसाने केंद्रीय मंत्रालयात काम केले होते. राजकीय, सामाजिक प्रश्‍नांमध्ये साथ देणारा आमचा सहकारी आणि आमच्या पिढीतील भक्कम मार्गदर्शकाला मुकलो आहे असे खा. शरद पवार यांनी बोलताना सांगितले. यावेळी शरद पवार भावनावश झाले होते.