शेखर गोरें यांच्यावर मोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

सातारा: म्हसवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत खंडणी व खुनाच्या प्रयत्नांचे गुन्हे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माणचे नेते शेखर गोरेंसह चौघांवर मोका कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्याच्या राजकिय वर्तूळात खळबळ उडाली आहे.
खंडणीसाठी दहशत निर्माण करून आर्थिक गुन्हेगारी जिल्ह्यात वाढू लागली आहे. याला आळा घालण्यासाठी अशा गुन्हेगारांवर मोका कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलिस अधिकार्‍यांना दिले होते. म्हसवड पोलिस ठाण्यातंर्गत अशा प्रकारचे गुन्हे करणार्‍यांवर म्हसवड पोलिस ठाण्याचे सहायक निरिक्षक व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पद्माकर घनवट लक्ष ठेऊन होते. त्यातच वरकुटे मलवडी (ता. माण) येथे खंडणीसाठी गिरिराज रिन्युएबल्स कंपनीच्या जागेत घुसून जेसीबी मशिनच्या सहाय्याने बांधकाम पाडण्याची घटना 25 ऑक्टोबर 2017 ला घडली होती. या प्रकरणी गोरेंसह 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यात काही जणांना अटकही केली होती.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, संशयित लोक खंडणीसाठी दहशत निर्माण करणे, दरोडा टाकून वाहने पळविणे, अशा प्रकारचे गुन्हे करून आर्थिक फायदा करून टोळी चालवत असल्याचे समोर आले.
या प्रकारामुळे शेखर गोरे यांच्या टोळीविषयी परिसरात दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे अधीक्षक पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार म्हसवडचे सहाय्यक निरिक्षक मालोजीराव देशमुख यांनी शेखर गोरे टोळी विरूध्द संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार (मोका) कारवाई करण्याचा प्रस्ताव श्री. पाटील यांच्याकडे पाठविला होता. श्री. पाटील यांनी हा प्रस्ताव कोल्हापूरचे विशेष पोलिस महानिरिक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावाला नांगरे पाटील यांनी मंजूरी दिली आहे.
त्यानुसार या प्रकरणांत राष्ट्रवादीचे नेते शेखर भगवान गोरे (रा. बोराटवाड, ता. माण), नगरसेवक संग्राम अनिल शेटे (वय 23, रा. म्हसवड), सतीश आनंदा धडांबे (वय 36), सागर शंकर जाधव (वय 30, दोघे महिमानगड) यांच्यासह अन्य 20 जणांवर हा गुन्हा दाखल झाला आहे.
या गुन्ह्याचा तपास दहिवडीचे पोलिस उपअधीक्षक यशवंत काळे यांच्याकडे देण्यात आला आहे.