कार्यकर्त्यानी शेती-पाण्याची चिंता करु नये : चंद्रकांत पाटील

वडूज: भाजपा-शिवसेना युती शासनामुळेच दुष्काळी भागातील शेती-पाणी योजना मार्गी लागल्या आहेत. या भागाला पाणी देणे हे आम्ही परमकर्तव्य समजतो. या प्रश्‍नासंदर्भात कार्यकर्ते व शेतकरी बांधवांनी कसलीही चिंता करु नये असा ठाम विश्‍वास महसूल व बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.
निमसोड (ता. खटाव) येथील जेष्ठ कार्यकर्ते धोंडीराम मोरे यांच्या निवासस्थानी झालेल्या मोरे गट व काँग्रेस-भाजप मित्र मंडळाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगांवकर, युतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर, शेखर चरेगांवकर, विक्रम पावस्कर, अनिल देसाई, जितेंद्र पवार, बाजार समितीचे संचालक काकासाहेब मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.मंत्री पाटील म्हणाले, 1995 साली तत्कालीन युती शासनाने सुरु केलेल्या पाणी योजनांची कामे काँग्रेस आघाडी शासनाने जाणीवपूर्वक रखडवली. हा अनुशेष भरुन काढण्यासाठी सद्याच्या राज्य शासनाने गेली चार वर्षे जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. बहुतांशी योजनांची कामे पुर्णत्वाकडे गेली आहेत. नजीकच्या काळात खटाव-माण तालुक्याला जिहे-कठापूरचेही पाणी मिळणार आहे. सुनिल मोरे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास माजी सरपंच सुभाषराव शितोळे, माजी उपसरपंच संतोष देशमुख, उत्तमराव मोरे, दिलीप मोरे, सोपान मोरे, रविंद्र मोरे, धनाजी चव्हाण, अंकुश मोरे, रमेश मोरे, भिमराव मोरे, अमोल माने, धनाजी देशमुख, विठ्ठल मोरे, संजय हुलगे, धनाजी कदम आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.