शिवशक्ती (मुंबई) व सतेज (बाणेर) नगराध्यक्ष चषकाचे मानकरी ; महिला गटात सातारच्या शिवाजी उदय मंडळाला उपविजेतेपदावर समाधान

साताराः येथील नगरपरिषदेमार्फत व कबड्डी असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री.छ. प्रतापसिंह उर्फ दादामहाराज नगराध्यक्ष चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत महिला गटात शिवशक्ती मुंबई व पुरूष गटात बाणेरच्या सतेज संघाने विजेतेपदाचा चषक जिंकला.
सातारा येथील तालीम संघाच्या मैदानावर गेले चार दिवस सुरू असलेल्या या स्पर्धाचा समारोप काल मध्यरात्री बक्षीस समारंभाने संपन्न झाला. या स्पर्धेत सातारकरांना पहायला मिळालेल्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील तसेच प्रो कबड्डी स्पर्धेतील दिग्गज खेळाडूंनी दाखविलेल्या या खेळातील चढाया, पकडी व चुरशीचे प्रदर्शन करत स्पर्धेत रंगत आणली. महिला गटातील अंतिम सामना सातारा येथील शिवाजी उदय मंडळ विरूध्द मुंबईच्या शिवशक्ती संघाचे दरम्यान संपन्न झाला. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणार्‍या या स्पर्धेत सामन्याच्या प्रारंभी शिवाजी उदयने चांगली लिड घेतली मात्र मध्यतरांअखेर या सामन्यावर शिवशक्ती संघाने आपली मजबूत पकड निर्माण करून गुण मिळविण्यात पुढाकार घेत अखेरपर्यत शिवाजी उदयला रोखून धरले आणि सामन्याच्या अखेरीस विजय खेचून आणला.  या सामना दरम्यान पंचांनी दिलेले टेक्निकल पॉइंट याचा निषेध करत शिवशक्ती मंडळाच्या पौर्णिमा जेधे या खेळाडूने केलेला कांगावा, आवाजी भांडण, व पंचांची घातलेली हुज्जत यामुळे तिला पंचांनी रेड कार्ड दाखवत संघातून बाहेर हाकलले. मध्यतरांपर्यंत 15-14 असा गुणफलक असताना सामना संपताना 34 गुण करत शिवशक्तीने 27 गुण करणार्‍या शिवाजी उदयलापराभवाची धूळ चारली.
अंतिम सामन्यात पुरूष गटात शाहु सडोली विरूध्द सतेज बाणेर सामना रात्री उशिरापर्यंत रंगत गेला. आणि हा सामना 9 गुणांची आघाडी घेत सतेज बाणेरने जिंकला. उत्कृष्ट चढाया, जोरदार पकडी यामुळे हा सामना रंगतदार ठरला.
अंतिम सामन्याच्या समाप्तीनंतर स्पर्धेचे संयोजक व पालिकेचे उपाध्यक्ष सुहास राजेशिर्के, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संभाजीराव माने, माजी उपाध्यक्ष रवि पवार, क्रिडा समिती प्रमुख सुजाता राजेमहाडीक, किशोर शिंदे, स्मिता घोडके, संगिता आवळे,अ‍ॅड. प्रताप पवार, ऋतुजा पवार, अनिता घोरपडे, बांधकाम समिती सभापती मनोज शेंडे, संग्राम उथळे, स्पर्धेचे निरीक्षक व राष्ट्रीय खेळाडू उत्तमराव माने, नितीन शिंदे, पालिकेचे नगरसेवक, पदाधिकारी, राष्ट्रीय कबड्डीपटू, स्पर्धेचे प्रमुख पंच अजित पाटील, सहपंच समीर थोरात आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपाध्यक्ष सुहासराजे शिर्के म्हणाले की, गेली सात वर्षे सुरू असलेली महिलांसाठीची ही राज्यस्तरीय स्पर्धा यावर्षीपासून लोकायुक्त प्रथम नगराध्यक्ष श्री.छ. प्रतापसिंह राजे उर्फ दादा महाराज यांचे नावे सुरू करण्यात आली. अल्पावधीतच ही स्पर्धा विशेष लोकप्रिय होवून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचेल असा विश्‍वास वाटतो. यावर्षी या स्पर्धेत नामांकित खेळाडूंनी सादर केलेले आपले कौशल्य नव्या खेळाडूंसाठी मोठे मार्गदर्शनपर ठरणार आहे.
प्रमुख पाहुणे संभाजीराव माने यांनी सर्व खेळाडूंना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देत सातारा पालिकेच्या या अनोख्या व देशी खेळाला प्रोत्साहन देणार्‍या स्पर्धेतून अधिकाअधिक चांगले खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.
यामध्ये पुरूष गटातील चषकाचे मानकरी बाणेरच्या सतेज संघास ट्रॉफी व 51 हजार रूपये प्रदान करण्यात आले. उपविजेत्या शाहू सडोली संघास 31 हजार रूपये व चषक, तृतीय क्रमाकांचे 10 हजार रूपयांचे पारितोषिक भैरवनाथ भोसरी संघास व चतुर्थ क्रमाकांचे 10 हजार रूपयाचे पारितोषिक इस्लामपूर व्यायाम मंडळ संघास प्रदान करण्यात आले तसेच या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अक्षय जाधच-सतेज बाणेर संघ, उत्कृष्ट चढाईसाठी शाहू सडोलीचा महेश मगदूम, उत्कृष्ट पकड इस्लामपूर व्यायाम मंडळाचा अजिंक्य वडार, व स्टार ऑफ द डे भोसरी संघाच्या रोहित पार्टे याला प्रदान करण्यात आले. महिला गटात प्रथम पारितोषिक व नगराध्यक्ष चषक रू. 51000/- रोख मुंबईच्या शिवशक्ती संघास उपविजेता चषक व 31 हजार रूपये रोख सातारच्या शिवाजी उदय मंडळास, तृतीय क्रमांक कोल्हापूरच्या जय हनुमान बाचडी संघास, चतुर्थ क्रमांक पुणे येथील जागृती प्रतिष्ठानला प्रदान करण्यात आला. महिला गटात स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून शिवशक्ती मुंबईच्या रेखा सावंत हिला 11 हजार रूपयाचे बक्षिस व चषक प्रदान करण्यात आला. तर स्टार ऑफ द डे साठी शिवाजी उदय मंडळाच्या पल्लवी डांगरे हिला तर उत्कृष्ट पकडीसाठी जागृती पुण्याच्या सिध्दी मराठे व सर्वोत्कृष्ट चढाईसाठी सोनाली हेळवी हिला गौरवण्यात आले. समीर थोरात यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. आकर्षक फटाक्यांच्या आतिषबाजीत रंगलेला हा सोहळा पाहण्यासाठी हजारो सातारकरांची मोठी उपस्थिती होती.
(छायाः अतुल देशपांडे)