सातारा येथे गुढीपाडव्यापासून श्रीराम महायज्ञाचे आयोजन

सातारा : येथील चिमणपूरा पेठेतील श्रीकृष्ण यजूर्वेद पाठशाळेत शनिवार दि.6 एप्रिल ते शनिवार दि. 13 एप्रिल 2019 दरम्यान श्रीराम महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. कर्नाटकातील श्रृंगेरीपिठाचे शंकराचार्य जगद्गुरु भारतीतीर्थ स्वामी यांच्या प्रेरणेने व आर्शिवादाने प्रतिवर्षाप्रमाणे हा राम महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती शारदापीठाचे महाराष्ट्र प्रतिनिधी व श्रीकृष्ण पाठशाळेचे प्राचार्य वेदमुर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांनी दिली.
गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर 6 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 1 या वेळेत ब्रह्मध्वजारोहण, शांती सुक्त पठन, पुण्याह वाचन, मातृकापूजन, नांदी श्राध्द, आचार्यवरण, उदकशांत, श्रीराम पंचायतनासहित पीठस्थ देवतांचे आवाहन, पूजन, अग्निमंथन, अग्निस्थापना, नवग्रह यज्ञ, पुरषसुक्त हवन, श्रीरामनाम हवन होवून दुपारी 4 ते 5.30 या वेळेत मीरा भक्ती मंडळ यांचे भजन होणार आहे. रविवार दि. 7 रोजी सकाळी 8 ते 1 यावेळेत भगवान सुर्य नारायण प्रीत्यर्थ सौरसुक्त हवन व श्रीराम नामाचे हवन होणार आहे. दुपारी 4 वाजता मुक्ताई मंडळाचे भजन होणार आहे. सोमवार दि. 8 रोजी सकाळी 8 ते 1 या वेळेत भवानी शंकर महाऋद्र देवता प्रीत्यर्थ लघुऋद्र स्वाहाकार व रामनामाचे हवन होवून दुपारी 4 वा. विष्णू कृपा भजनी मंडळाचे भजन होणार आहे. मंगळवार दि. 9 रोजी श्री गणपती प्रीत्यर्थ गणपती अर्थवशीर्ष स्वाहाकार होवून श्रीराम नामाचे हवन होणार आहे. दुपारी 4 वाजता शारदा गणेश मंडळाचे भजन होणार आहे. बुधवार दि. 10 रोजी सकाळी 8 ते 1 या वेळेत महाऋद्र हनुमान देवता प्रीत्यर्थ मन्यूसुक्त स्वाहाकार, महालक्ष्मी प्रीत्यर्थ श्री सुक्तहवन व श्रीराम नामाचे हवन व दुपारी 4 वा. ओंकार अक्षय भजनी मंडळाचे भजन होणार आहे, गुरुवार दि. 11 रोजी श्री सदगुरु प्रीत्यर्थ ब्रम्हा विष्णू महेश सुक्त स्वाहाकार व श्रीराम नाम हवन होवून दुपारी 4 वाजता राधाकृष्ण मंडळाचे भजन होणार आहे. शुक्रवार दि. 12 रोजी सकाळी 8 ते 1 या वेळेत शांती सुक्त पठण आवाहीत देवतांचे पूजन अग्नीध्यान दुर्गासप्तक्षती पाठ स्वाहाकार व रामनामाचे हवन होवून यज्ञांगभूत दाम्पत्य, कुमारीका सुहासीनी पूजन व श्रीराम सदगुण गौरव सन्मान प्रदान सोहळा होणार आहे. दु. 4 वा. शारदा भजनी मंडळाचे भजन होणार आहे.
शनिवार दि. 13 रोजी सकाळी 8 ते 1 या वेळेत प्रभू श्रीराम चंद्राच्या प्रीत्यर्थ पुरषसुक्त स्वाहाकार, रामनाम हवन, बलिदान, यज्ञपूर्णाहूती व श्रीराम जन्मकाळाचे किर्तन ह. भ. प. कु. वेदीका विवेक गोडबोले करणार आहे. सायंकाळी 5 वाजता श्रीराम शोभायात्रा यज्ञस्थळापासून काढली जाणार आहे.
महायज्ञ कार्यक्रमात दररोज रात्री 8 वाजता यज्ञ स्थळी महाआरती होणार असून सा. 5.30 ते 7.30 या वेळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शनिवार दि. 6 एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान तत्वार्थ रामायण निरुपण सप्ताह आयोजित केला असून वेदमुर्ती विवेकशास्त्री गोडबोले हे निरुपण करणार आहेत.
या सर्व कार्यक्रमांना हार्मोनियम साथ दत्तात्रय डोईफोडे व तबला साथ मिलिंद देवरे यांची असणार आहे.
या सर्व कार्यक्रमांना सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.