श्री संत मातोश्री सरुताई माऊली यांच्या सहाव्या पुण्यस्मरण सोहळ्याचा आज मुख्य दिवस ; अश्वरिंगण सोहळा व रथोत्सवाची उत्सुकता

 

 

मायणी :- (सतीश डोंगरे) ( श्रीसंत सद्गुरू सरुताई यांच्या जीवनकार्यांचा घेतलेला संक्षिप्त आढावा) पवित्र ते कुळ पावन तो देश । जेथे हरिचे दास जन्म घेती । या पंक्तीनुसार मायणी नगरीमध्ये सद्गुरु सरुताई माऊलींचा जन्म १९१६ मध्ये कृष्णाप्पा शेषाप्पा तावरे व द्रौपदा तावरे या विणकर दांपत्यांच्या पोटी झाला. सुरूताईंचे सासर व माहेर मायणीच आहे. १९३३ साली रघुनाथ कवडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना ३ अपत्ये झाली. ऐतिहासिक वारसा असणारी मायणी ही संताची भूमी होय. या पवित्र भूमीत श्रीसंत सद्गुरू सरुताई  यांना मायणीचे संत सद्गुरु यशवंत बाबांचा अध्यात्मिक वारसा लाभला. त्यानंतर ताईंना लोककल्याण, मोक्ष साधनेची व अध्यात्माची ओढ लागली. लोक त्यांना वेडी सरु असे म्हणत असत. परंतु त्यांचे वेड होते ईश्‍वर भक्तीचे, जनकल्याणाचे, लोकहिताचे होते. वाईट मार्गाने जाणाऱ्या लोकांना त्या शिव्या देत. नेहमी सत्याच्या मार्गाने चाला-

सर्वांच्या हिताचे, कल्याणाचे चिंतन करा हा उपदेश ,आशीर्वाद त्यांनी लोकांना दिला. ताईंनी अनेकांचे कल्याण केले. ताईचा अध्यात्मिक क्षेत्रातील अधिकार मोठा होता. त्यांची वाणी खरी ठरत होती म्हणून त्या संत प्रभावळीत

शोभून दिसतात. प्रति पौर्णिमेला ताईंच्या मठात अन्नदान केले जाते. प्रतिवर्षी गुरुपौर्णिमा,

पुण्यस्मरणदिन, व प्रकटदिन साजरा केला जातो. प्रत्येक दिवशी सकाळी ७ वा., दुपारी १२ वा. वरात्री ८ वा. मठात आरती होते. प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी ६ ते ७ – प्रवचन असते. दर पौर्णिमेला महाआरती, किर्तन, प्रवचन व महाप्रसाद असतो. आज होणाऱ्या ताईंच्या सहाव्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सरुताई लिलाअमृत ग्रंथाचे असंख्य भाविकांनी  पारायण केले. गेल्या चार दिवसांपासून सुरू असणाऱ्या या सोहळ्यात  नामांकित व्याख्यात्यानी व्याख्यान प्रवचन, हरिपाठ, किर्तन, जागर, काकडा केला. त्याच बरोबर भक्तिमय सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद येथील हजारो भाविकांनी घेतला.  आजच्या मुख्य दिवशी भल्या पहाटे ४ वाजून ३२ मिनिटानी त्यांचा फुलांचा कार्यक्रम पार पडणार असून त्यानंतर गावातून हत्ती, घोडे, उंट, लेझीम, झांजपथक, भजनी मंडळे,गजी, टाळकरी,यांच्या गजरात कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष खा. संजय काका पाटील यांच्या प्रमुख उपस्थित  आणि सौ. उर्मिला येळगावकर व डॉ दिलीपराव येळगावकर यांच्या शुभहस्ते हजारो भक्तांच्या सोबत रथोत्सव व पालखी सोहळा संपन्न होणार आहे. तरी या सोहळ्याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत सद्गुरू मातोश्री सरुताई चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.