पाटणला राज्यस्तरीय शुटींग बॉल स्पर्धांचा दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न

पाटण: पाटण तालुक्याचे माजी सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री विक्रमसिंह पाटणकर (दादा) यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त येथील नगरपंचायत कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या श्रीमंत कै. सौ. उमादेवी पाटणकर क्रीडानगरीत राज्यस्तरीय शुटींग बॉल स्पर्धांचा दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडला. पाटण नगरीच्या प्रथम नागरीक सौ. सुषमा महाजन व उपनगराध्यक्ष दीपक शिंदे यांच्या हस्ते मैदान क्र. 1 व 2 चे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पाटण नगरपंचायतीचे नगरसेवक सचिन कुंभार, संजय चव्हाण, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभागीय विकास अधिकारी अविनाश पाटील, सुनिल पानस्कर, विकास अधिकारी शंकरराव मोरे यांच्यासह पाटण स्पोर्टस असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी पाटण स्पोर्टस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल यादव, कोषाध्यक्ष दिनकरराव जगताप, सचिव इलाही मोमीन यांनी श्रीफळ देवून स्वागत केले.
प्रास्ताविकात सचिव इलाही मोमीन म्हणाले, पाटण स्पोर्टस असोसिएशनमार्फत गेली 37 वर्षे शुटींग बॉल स्पर्धांचे भव्य सामने भरविले जातात. पाटण येथे भरवण्यात येत असलेल्या सामन्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात बोलबाला असून या स्पर्धांच्यासाठी महाराष्ट्राबाहेरील दिल्ली, हरियाणा, राजस्थान, पंजाब आदी ठिकाणाहून संघ सहभागी होत आहेत. महाराष्ट्रातील मालेगाव, जामनेर, औरंगाबाद, मणेराजूरी, माळशिरस, रायगड, सावर्डे, सांगली, कोल्हापूर, सातारा, इस्लामपूर आदी ठिकाणचे नावाजलेले संघ सहभागी झाले असल्याचे सांगितले.
याप्रसंगी बोलताना सौ. सुषमा महाजन यांनी दादांच्या वाढदिवसानिमित्त पाटण स्पोर्टस असोसिएशनने दीर्घकाळ स्पर्धांचे आयोजन करून स्तुत्य उपक्रम राबविला असल्याचे सांगून धन्यवाद दिले. इक्बाल हकीम यांनी आभार मानले. यावेळी शिवराम कवडे, सी. के. देशमुख, गणपतराव साळुंखे, राजू कांबळे, जयवंत सुर्वे, रमेश देसाई, राजेंद्र पाटणकर, राजू पवार, मनोहर यादव, इक्बाल शेख, गणेश यादव, राजेंद्र गोविंदराव पाटणकर यांच्यासह क्रीडारसिक उपस्थित होते.