सिध्दनाथ-जोगेश्‍वरीची लक्ष्मी-विष्णू रुपातील शेषनागावरील नेत्रदिपक पूजा

म्हसवड : लाखो भाविकांचे कुलदैवत व म्हसवडचे ग्रामदैवत श्री सिध्दनाथ व माता जोगेश्‍वरी यांच्या बारा दिवसाच्या नवरात्रानिमित्त शेष नागावर आरुढ झालेल्या लक्ष्मी-विष्णू (वधू-वर) रुपातील नेत्रदीपक पूजा बांधण्यात आली होती.
श्री सिध्दनाथ व माता जोगेश्‍वरी यांच्या विवाहानिमित्त बारा दिवसाच्या नवरात्राचे (उपवासाचे) औचित्य साधून सदर बारा दिवस श्रींची विविध रुपात दररोज वेगवेगळ्या रुपात पूजा बांधली जाते. श्रींचा विवाह सोहळा कार्तिक शुध्द प्रतिपदा (दिपाळी पाडवा) या दिवशी सुरु होऊन मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदा (रथयात्रा) या दिवसापर्यंत संपूर्ण एक महिनाभर चालतो. या दरम्यान दीपावली पाडव्यादिवशी पहाटे साडेपाच वाजता घटस्थापनेने सुरुवात होऊन त्याच दिवशी दुपारी 12 वाजता, शेकडो, हजारो महिलांच्या उपस्थितीत श्रींचा हळदी समारंभ संपन्न होतो. त्या दिवसापासून सलग 12 दिवस श्रींचे कडक उपवास (नवरात्र) सुटतात त्याच दिवशी (तुलसी विवाह) रात्री 12 वाजता श्रींचा विवाह सोहळा पारंपारिक पध्दतीने व धार्मिक रितीरिवाजानुसार संपन्न होत असतो. दरम्यानच्या 12 दिवसात श्रींच्या विविध रुपातील आकर्षक अशा दर्शनाचे भाग्य भाविकांना लाभते.

 

श्रींच्या विवाह सोहळ्याची सांगता मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदा म्हणजे रथयात्रेने होत असते. रथयात्रा म्हणजेच श्रींची वरात रथयात्रे दिवशी महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक आदी राज्यातून लाखो भाविक श्रींच्या रथावर गुलाल खोबर्‍याची मुक्तपणे उधळण करीत असतात. श्रींच्या या बारा दिवसातील विविध रुपातील आकर्षक व लक्षवेधक नेत्रदीपक पूजा बांधण्यासाठी मंदिराचे मुख्य पुजारी सालकरी दत्तात्रय गुरव (व्हंकारे), तसेच सुनिल कीर्तने, वैभव गुरव, विनायक गुरव आदी सहाय्यक कलाकार नेहमीच परिश्रम घेत असतात.