सिध्दनाथाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात रथोत्सव उत्साहात 

म्हसवड: सिध्दनाथाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात व लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांच्या रथावर गुलाल खोबर्‍याची उधळण करीत रथोत्सव मोठ्या  उत्साहात पार पडला.
अखिल महाराष्ट्र तसेच आंध्र, कर्नाटक या राज्यातील अनेक भाविकांचे श्रध्दास्थान व दैवत असणार्‍या म्हसवड येथील श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांच्या उत्सवमूर्ती सालकरी यांच्या घरुन वाजत-गाजत रथामध्ये बसवण्यात आल्या. रथामध्ये उत्सवमूर्ती बसवल्यानंतर श्रींच्या मूर्तींच्या रथातून मिरवणुकीस प्रारंभ झाला. रथावर बसण्याचा मान राजेमाने घराण्याचा असून  अजितराव राजेमाने, बाळासाहेब राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, सयाजी राजेमाने, विजयसिंह राजेमाने, गणपतराव  राजेमाने, शिवराज राजेमाने, तेजसिंह राजेमाने, दिपसिंह राजेमाने, शहाजीराजे राजेमाने, विश्वजित राजेमाने तसेच बाळासाहेब माने,माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, दादासाहेब कांबळे,पोलीस उपविभागीय अधिकारी यशवंत काळे,तहसीलदार सुरेखा माने,मुख्याधिकारी पंडित पाटील,सपोनि मालोजीराव देशमुख यांच्या उपस्थित रथोत्सवास प्रारंभ झाला.
श्रींचा विवाह सोहळा एक महिनाभर चालतो. दिवाळी पाडव्यादिवशी घटस्थापनेचे व हळदी समारंभाने या विवाह सोहळ्यास प्रारंभ झाला. त्यानंतर तुळशीविवाह, श्री सिध्दनाथांचा व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न होवून  आज रविवार रोजी लग्नानंतरची वरात म्हणजेच रथोत्सव संपन्न झाला.
रथ नगरप्रदक्षिणेस सुरुवात झाल्यानंतर यावेळी बायपास रस्त्याने सुरुवात झाली. भाविकांनी सिद्धनाथाच्या नावाने चांगभलं च्या गजरात रथावर गुलाल व खोबर्‍याची उधळण केली. तसेच  अनेक भक्तांनी निशाने, नारळाची तोरणे, पैशांच्या नोटांची तोरणे श्रींना अर्पण केली.अवघी म्हसवडनगरी गुलालात न्हाऊन गेली होती. रथ नगरप्रदक्षिणेसाठी निघाल्यानंतर उजवी प्रदक्षिणा घालून रथ बायपास रस्त्याने नवीन नगरपालिका ,महात्मा फुले चौक व तसेच पुढे बसस्थानक चोकातून सातारा – पंढरपूर रस्त्यावर ओढत आणला. तेथून पुढे श्री सिध्दनाथ यांच्या बहिणीस मानकर्‍यांच्या हस्ते साडी-चोळी यांचा आहेर करण्यात आला. याच ठिकाणी नवसाची मुले रथावरुन खाली टाकण्यात आली व नवस फेडण्यात आले. त्यानंतर रथ वाघजाई ओढ्यातून पुढे कन्या विद्यालय श्री लक्ष्मीआई मरीआई मंदिर मार्गावरुन रथाने  नगरप्रदक्षिणा पूर्ण  केली.
भाविकांच्या सोयीसाठी एस. टी. महामंडळातर्फे  कराड, वडूज, अकलूज, विटा, सातारा, मेढा, सोलापूर, पंढरपूर, आटपाडी आदी आगारांनी जादा बसेस  सोडल्या होत्या.म्हसवड पोलिस स्ठेशनच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवला होता. यामध्ये पोलिस उपअधीक्षक यशवंत काळे यांच्यासह सात पोलिस अधिकारी, 140 पोलिस कर्मचारी, 35 महिला अधिकारी,सपोनि  मालोजीराव  देशमुख आपत्कालीन पथक यांचा समावेश होता.
  म्हसवड नगरपरिषदेचे  नगराध्यक्ष तुषार वीरकर,  उपनागराध्यक्षा स्नेहल युवराज सूर्यवंशी, स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापती हिंदमालादेवी राजेमाने, पाणीपुरवठा समिती सभापती, सविता म्हेत्रे, कलाबाई पुकळे, शिक्षण सभापती शहाजी लोखंडे, नियोजन समिती सभापती गणेश रसाळ, गटनेते धनाजी माने, केशव कारंडे, दीपक बनगर, मनीषा विरकार, साळूबाई कोळेकर, तेजस्वी सोनावणे, डॉ.वसंत मासाळ, रणजित येवगे, शोभा लोखंडे, पालिकेतील विरोधीपक्ष नेते अकिल काझी, विकास गोंजारी,माजी नगराध्यक्ष विलासराव माने,विजय सिन्हा,विजय धट,नितीन दोशी, सुरेश म्हेत्रे, दहिवडीच्या नगराध्यक्षा साधना गुंडगे, आप्पा पुकळे,सर्जेराव माने,युवराज सूर्यवंशी, बबनदादा वीरकर, दत्तोपंत भागवत, तात्या भोरे, प्रा. विश्वंभर बाबर,प्रा.कविता म्हेत्रे ,माजी सरपंच काका माने, बाळासाहेब मासाळ,अरविंद पिसे,बबन अब्दागिरे आदींनी सिद्धनाथाच्या रथावर गुलाल खोबर्‍याची उधळण केली.
रथयात्रे निमित्त मंदीरात श्रीचे दर्शनासाठी भाविकांच्या पहाटे पासुनच दर्शनबारीत  भाविकांच्या रांगा लागलेल्या होत्या. यात्रे निमित्त रिंगावण पेठ मैदानातील यात्रा भरली आहे यात्रेत खरेदीसाठी भाविकांची मोठी गर्दी आज दिवसभर टिकुन होती.उंच व गोलाकार फिरणारे यांत्रिक पाळणे,मौतका कुँवा,नाना-नानी पार्क इत्यादी खेळांच्या साधनाकडे बालगोपाऴांची मोठी गर्दी होती. विविध मिठाई विक्रते, खेळणी,व इतर साहित्य विक्रेत्यांचीही दुकाने भाविकांच्या गर्दीने फुलुन गेली होती.
भाविकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने यंदा यात्रा नियोजनात खुपच बदल करण्यात आल्याने ठिककाणी पर्यायी वाहनतळ सुविधा करण्यात आली होती.गावोगावच्या मानाच्या काट्या व सासणे मुक्कामासाठी बाजार पटांगणात सुविधा करण्यात आली होती.विशेष बाब म्हणजे यात्रा सुरक्षित पार पाडण्यासाठी प्रथमच प्रशासन पातळीवर खुपच दक्षता घेण्यात आली होती.
प्रशासनाच्यावतीने प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, डी वाय एस पी यशवंत काळे, सपोनि मालोजीराव देशमुख, तहसिलदार सुरेखा माने, म्हसवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील, इंजिनियर नितीन तिवाटने, चैतन्य देशमाने व नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी, पुरवठा अधिकारी राहुल जाधव, गावकामगार तलाठी गुलाब उगल मोगले, मंडलाधिकारी जगताप, तालुका वैद्यकिय अधिकारी  डॉ. लक्ष्मण कोडलकर यांनी रथोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले.