वडूज येथे सिध्दीविनायक रथोत्सव उत्साहात

वडूज : ज्ञानोबा माऊली तुकाराम.. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल… च्या जयघोषात, ढोल ताश्यांच्या गजरात  हजारो भाविकांच्या उपस्थितीत आज येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरीनाम सप्ताहाची श्री सिद्धीविनायक रथोत्सवाने उत्साहात सांगता करण्यात आली.
 आज सकाळी ह.भ.प. श्याम महाराज (आळंदी) यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी वाचनाची सांगता करण्यात आली. त्यानंतर ह.भ.प. विजय महाराज शिंदे (लोणी) यांचे काल्याचे किर्तन झाले. दुपारी साडे बारा वाजता ह.भ.प. जयंत कुलकर्णी (भोसरे) यांचे श्री गणेश जन्माचे किर्तन झाले. यावेळी परिसरातील हजारो भाविकांची पारायण मंडपात उपस्थिती होती. श्री गणेश जन्माच्या  किर्तनानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर मंडपातील दहिहंडी फोडण्यात आली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पारायण मंडळाचे विश्वस्त , विविध मान्यवर व  ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत  रथामध्ये श्रींची व श्री ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा ठेवण्यात आली. बोला पुंडलीक वरदे…चा गजर करीत रथोत्सव मिरवणूकीला सुरूवात करण्यात आली. मिरवणूकीत गावोगावचे वाद्यवृंद संच सहभागी झाले होते. सगळीकडे ज्ञानोबा माऊली तुकाराम…चा जयघोष दुमदुमत होता.
दहिवडी कर्‍हाड रस्ता, आयलँड चौक, बस स्थानक, पंचायत समितीमार्गे पुसेगाव रस्ता, जिल्हा सत्र न्यायालय, कर्मवीर नगर, भाग्योदय नगर, पेडगाव रस्ता, हुतात्मा परशुराम विद्यालय, हुतात्मा स्मारक, मुख्य बाजारपेठ, शेतकरी चौक मार्गे रात्री उशिरा ही मिरवणूक श्री सिद्धीविनायक मंदिराजवळ पोहोचली.
रथोत्सवानिमित्त शहरातील विविध सार्वजनिक मंडळे, सेवाभावी संस्थांच्यावतीने भाविकांना अल्पोपहार, सरबताचे वाटप करण्यात आले. तसेच काही ठिकाणी मंडळांनी दहिहंडी बांधली होती. शहरात तसेच विस्तारीत भागांतील सुयोगनगर, कर्मवीरनगर, भाग्योदय नगर, पेडगाव रस्ता येथे महिलांनी रस्त्यांवर सडा-रांगोळी काढून रथ मिरवणूकीचे स्वागत केले. रथावर भाविकांनी नारळाची तोरणे तसेच रोख रक्कम अर्पण केली.
रथोत्सवामुळे शहरात  ठिकठिकाणी मेवा मिठाई, खेळण्यांची दुकाने थाटली होती. बाजार पटांगण परिसरात लहान मोठ्या आकारांचे पाळणे दाखल झाल्याने शहराला यात्रेचे स्वरूप आले होते.  उपस्थित भाविक भक्तांना कै. संपतराव काळे यांच्या स्मरणार्थ कुटूंबियांनी महाप्रसाद वाटप केले.
फोटो ओळी