सिल्व्हर स्मॅश

रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडू पी.व्ही.सिंधू हिने रौप्य पदकाची कमाई केली. सिंधूने अंतिम फेरीच्या लढाईत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिला कडवी झुंज दिली. तिसऱया गेमपर्यंत खेळल्या गेलेल्या या चुरशीच्या लढाईत पी.व्ही.सिंधूला 21-19, 21-12, 21-15 असा पराभव पत्करावा लागला. डावखु़र्‍या कॅरोलिनाच्या डावपेचांचा सिंधूने उत्तम प्रतिकार केला. क्रमवारीत अव्वल स्थानी असूनही कॅरोलिनाचा सुवर्णपदकाचा मार्ग सोपा नव्हता. तिसर्‍या गेमपर्यंत सिंधूने कॅरोलिनाला झुंज दिली. पहिल्या गेममध्ये पिछाडीवर असताना 19 व्या गुणानंतर सिंधूने दमदार स्मॅशच्या जोरावर पुनरागमन करत पहिला गेम 21-19 असा जिंकला. त्यानंतर दुस़र्‍या गेममध्ये कॅरोलिनाने पहिल्या गेम गमावल्याचा कोणताही दबाव निर्माण न होऊ देता आपल्या लौकिलाला साजेशी कामगिरी करत 21-12 असे पुनरागमन केले. त्यामुळे सामना तिसर्‍या आणि निर्णायक गेमपर्यंत पोहोचला. तिसर्‍या गेममध्ये दोघांमध्येही गुणांसाठी चुरशीची लढत पाहायला मिळाली. पण सरतेशेवटी कॅरोलिनाने 21-15 असा सामना जिंकून सुवर्णपदकावर नाव कोरले.
जागतिक क्रमवारीतील दुसऱया आणि सहाव्या मानांकित खेळाडूंना नमवून पी.व्ही.सिंधूने अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे सिंधूने अंतिम फेरीचा सामना गमावला असला तरी ती नक्कीच पात्र कौतुकास आहे. अव्वल प्रतिस्पर्धी यांचे दडपण घेण्याऐवजी आपली कामगिरी उंचावत तिने आपल्यातील कौशल्य जागतिक व्यासपीठावर सिद्ध करून दाखवले. कॅरोलिनाच्या आक्रमक खेळीला सिंधू जशास तसे प्रत्युत्तर देताना दिसली. प्रदीर्घ रॅलीचा प्रत्येक गुण सिंधूने कमावला होता. याशिवाय, सिंधूकडून घोटीव ड्रॉपचे सर्वोत्तम फटके आणि खणखणीत परतीच्या फटक्यांच्या नजराणा उपस्थितांना अनुभवण्याची संधी मिळाली.