सातार्‍यातील तीन खेळाडूंची स्पोर्टस अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया या प्रशिक्षण केंद्रात निवड

सातारा:औरंगाबाद येथील स्पोर्टस अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया (साई) या केंद्रात बॉक्सिंग विभागात सातारा येथील सातारा बॉक्सिंग अकॅडमीच्या तीन खेळाडूंची निवड झाली आहे. आयुष मोकाशी, चैत्राली पवार आणि रिषीका होले अशी या खेळाडूंची नावे आहेत.
मार्च 2016 मध्ये औरंगाबाद येथील साई प्रशिक्षण केंद्रात बॉक्सिंग खेळासाठीच्या प्रशिक्षण निवडीसाठी घेण्यात आलेल्या निवड चाचणीसाठी सातारा जिल्ह्यातून सातारा बॉक्सिंग अकॅडमीचे खेळाडू सहभागी झाले होते. विविध वजन गटात आणि बॉक्सिंग खेळाशी संबंधीत विविध प्रकारच्या निवड चाचणीमध्ये अकॅडमीच्या आयुष मोकाशी, चैत्राली पवार आणि रिषीका होले या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली होती. सदर निवड चाचणीचा निकाल नुकताच जाहिर झाला असून साई प्रशिक्षण केंद्रात बॉक्सिंग प्रशिक्षणासाठी अकॅडमीचे हे तीन खेळाडू पात्र ठरले आहेत.
या तीनही खेळाडूंना अकॅडमीचे मानद एनआयएस प्रशिक्षक सागर जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. तीन्ही खेळाडूंचे आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, सातारा बॉक्सिंग अकॅडमीचे हरिष शेट्टी, सौ. तन्वी जगताप, डॉ. राहूल चव्हाण, दौलतराव भोसले, निलेश यादव यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.