औंध येथील श्रीभवानी वस्तूसंग्रहालय पार्किंग परिसरातील स्वच्छतागृहाची दुरावस्था ; पर्यटकांची मोठी गैरसोय ; पुरातत्व विभागाने लक्ष घालण्याची मागणी

औंध (सचिन सुकटे) :- औंध येथील श्री भवानी वस्तूसंग्रहालय परिसराच्या पार्कींग क्षेत्रातील  स्वच्छतागृह मागील सहा ते सात वर्षांपासून बंद असून देखभाल दुरूस्ती अभावी लाखो रुपये खर्चून बांधलेल्या स्वच्छतागृह  पर्यटकांसाठी खुले करण्याची मागणी होत असून शासनाच्या पुरातत्व विभागाने यासाठी त्वरित निधी उपलब्ध करण्याची मागणी होत आहे. दरम्यान  या स्वच्छता गृहाची दुरवस्था झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,येथील मूळपीठ डोंगरावर नियमित हजारो भाविक, पर्यटक श्री यमाईदेवी दर्शनासाठी व श्रीभवानी वस्तूसंग्रहालय पाहण्यासाठी येतात .मात्र येथील पार्किंग क्षेत्रातील स्वच्छतागृह सहा ते सात वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे राज्याच्या तसेच परराज्यातून येणार्‍या पर्यटक,महिला पर्यटकांची बंद असलेल्या स्वच्छता गृहाअभावी कुचंबणा गैरसोय होत आहे. या स्वच्छता गृहामध्ये दोन शौचालय युनिटस व आठ मुर्त्या आहेत. पण हे सर्व बंद असल्याने संग्रहालय पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच हे युनिट बंद असल्याने  त्याच्या आतील भागाचे बरेच नुकसान झाले आहे. शौचालय तसेच मुर्त्या मधील भांडी फुटली आहेत.
दारे तुटली आहेत.वाँशबेसिनच्या पाईप तुटलेल्या आहेत. टाईल फरशा ही फुटलेल्या आहेत.
पाईपलाईन खराब झाली आहे. तसेच मागील टाकीचे ही नुकसान झाले आहे. शौचालय बरेच दिवस बंद असल्याने त्याच्या दुरुस्ती मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. त्यासाठी पुरातत्व विभागाने तातडीने यासाठी निधी उपलब्ध करावा अशी मागणी पर्यटक ,ग्रामस्थ वर्गातून केली जात आहे.
मागील काही महिन्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे हे युनिट ही अपुरे पडणार आहे. त्यासाठी संग्रहालय परिसराबाहेर पार्किंग क्षेत्रामध्ये पुरुष व महिलांसाठी वेगवेगळी युनिटस उभी करावीत.