सातार्‍यात 1 जानेवारीपासून राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा ; तालिम संघ मैदानावर रंगणार सामने ; 200 युवक, 100 युवतींचा समावेश

सातारा : सन 2017 साली 72 व्या वेस्टर्न इंडिया बॉक्सिंग स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर तब्बल 10 वर्षांनी महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेच्या मान्यतेने 77 व्या युवा मुलांच्या व 16 व्या युवा मुलींच्या राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्याचा मान सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेला मिळाला आहे. दि. 1 जानेवारी ते 5 जानेवारी या कालावधीत सातार्‍यातील तालिम संघ मैदाानावर या बॉक्सिंग स्पर्धेचा थरार सातारकरांना अनुभवायास मिळणार असून या स्पर्धेत राज्यातील 33 जिल्ह्यातून  सुमारे 300 युवा मुले व मुली बॉक्सर सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी दिली.
या स्पर्धेचा शुभारंभ 1 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता तालिम संघ मैदानावर अर्जुन पुरस्कार विजेते ऑलिंम्पिक बॉक्सर  गोपाल देगााव यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून सकाळी 8 ते 10 या वेळेत मान्यवर व बॉक्सर यांची भव्य रॅली तालिम संघ ते राजवाडा दरम्यान काढण्यात येणार असून स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ महाराष्ट्र ऑलिंम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 5 रोजी सायंकाळी 5.30 वाजता होणार असल्याचे कार्याध्यक्ष रविंद्र झुटींग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
स्पर्धेसाठी खुल्या मैदानात बॉक्सिंग रिंग, भव्य प्रेक्षागॅलरी आणि मान्यवरांसाठी स्टेजची उभारणी केली जाणार आहे. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेचे 25 पंच व राज्य संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार असून बॉक्सिंग खेळाचा प्रचार व प्रसार होण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत दररोज 80 नेत्रदीपक सामन्यांचा थरार सर्व क्रीडाप्रेमींनी अनुभवावा असे आवाहन सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडुंना राज्य संघटनेकडून पदक, प्रमाणपत्र, विजेत्या व उपविजेत्या जिल्हा संघाला बालाजी चॅरीटेबल ट्रस्ट, गोविंद मिल्क अ‍ॅन्ड मिल्क प्रॉडक्टस, कुपर उद्योग समुह, कराड अर्बन बँक यांच्याकडून चषक व याशिवाय बेस्ट बॉक्सर, बेस्ट लूझर, मोस्ट प्रोमिसींग, बेस्ट जज, बेस्ट रेफरी अ‍ॅवॉर्ड देण्यात येणार असल्याचे सचिव राजेंद्र हेंद्रे यांनी नमुद करुन जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास पाटील, शिवाजी उदय मंडळचे बबनराव उथळे, तालिम संघाचे साहेबराव पवार यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा संघटनेचे योगेश मुंदडा, सागर जगताप, निवृत्ती भोसले, प्रताप गुजले, रामचंद्र लाहोटी, आप्पा माढकर, मुर्ली वत्स्य, सुरेश शितोळे व पालक वर्गातून युवराज भारती, दौलतराव भोसले, रविंद्र होले, अमर मोकाशी, शैलेंद्र भोईटे, काळे आधी परिश्रम घेत आहेत.
या स्पर्धेत सातारा जिल्हा संघात खालील संघ प्रशिक्षक संघ व्यवस्थापक व 10 मुले व 5 मुली खेळाडूंची निवड दि. 24 रोजी करण्यात आली आहे.
मुली : श्रध्दा दळवी 45 ते 48 किलो, महीन अंबेकर 48 ते 51 किलो, माधुरी घोरपडे 51 ते 54 किलो, कल्याणी मगर 54 ते 57 किलो, प्रतिक्षा अवकिरकर 64 ते 69 किलो.
मुले : संकल्प गाढवे 46 ते 49 किलो, रोहीत पवार 49 ते 52 किलो, सौरभ राजे 52 ते 56 किलो, करण शिंदे 56 ते 60 किलो, स्वप्नील साळवी 60 ते 64 किलो, रोहन जाधव, 64 ते 69 किलो, ओमकार पवार 69 ते 75 किलो, अभिषेक कदम 75 ते 81 किलो, अब्दुल्ला मोदी 81 ते 91 किलो आदर्श कांबळे 91 किलो वरील. संघ प्रशिक्षक : साजीद शेख, प्रियांका माने, संघ व्यवस्थापक दिपाली जगताप.