यंदा तब्बल दोन हजार आठशे एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड 

महाबळेश्‍वरः स्ट्रॉबेरी लँड अशी नवी प्रादेशिक ओळख निर्माण करणाऱ्या महाबळेश्वरचे स्ट्रॉबेरी हे मुख्य पीक. स्ट्रॉबेरीला जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाल्याने अनेक शेतकरी या शेतीकडे वळू लागले आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरीच्या लागवड क्षेत्रातही झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. यंदा तब्बल दोन हजार आठशे एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली असून, तब्बल 1 हजार 850 शेतकरी स्ट्रॉबेरीची शेती करीत आहे. गेल्या सात-आठ वर्षांत हा आकडा दुपटीने वाढला आहे.
महाबळेश्वरात ब्रिटिश काळापासून स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जात आहे. कालांतराने स्ट्रॉबेरी हेच तालुक्याचे मुख्य पीक झाले. सध्या 1 हजार 850 शेतकरी स्ट्रॉबेरीची शेती करतात. याठिकाणची प्राकृतिक रचना, लाल माती, थंड हवा या सर्व बाबी पाहून शासनाने 2010 रोजी स्ट्रॉबेरीला जिऑग्राफिकल आयडेंटीफिकेशनफ घोषित केले आहे. त्यामुळे महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी लँडफ अशी नवी प्रादेशिक ओळखही मिळाली आहे.
येथील स्ट्रॉबेरीला जगभरातून मागणी वाढू लागल्याने शेतकयांना दरही चांगले मिळू लागले  आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी या शेतीकडे वळू लागले आहे. आठ वर्षांपूर्वी तालुक्यात सुमारे एक हजार शेतकरी स्ट्रॉबेरीची शेती करीत होते. मात्र, शेतीतून मिळणारे उत्पन्न पाहता तालुक्यातील सुमारे 1 हजार 850 शेतकरी स्ट्रॉबेरीची शेती करीत आहेत.स्वीट चार्ली, कॅमारोज, विंटर डाऊन, नाबिला या जातीच्या स्ट्रॉबेरींना अधिक मागणी असते. मात्र, नाबिला व कॅमारोजा या स्ट्रॉबेरीचा टिकाऊपणा अधिक आहे. तसेच ही फळे गोड व रसाळ असल्याने या दोन जातींच्या रोपांची तालुक्यात सर्वाधिक लागवड करण्यात आली आहे.
हायड्रोफोनिक तंत्रज्ञानाकडे वाढता कल
हायड्रोफोनिक तंत्रज्ञानाचा राज्यात सर्वप्रथम प्रयोग भिलार (ता. महाबळेश्वर) येथे करण्यात आला. हायड्रोफोनिक म्हणजे मातीविना शेती.पाच गुंठे क्षेत्रावरून यंदा 15 एकर क्षेत्रांत हायड्रोफोनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्ट्रॉबेरी लागवड करण्यात आली आहे.
रोपांना आवश्यक असणारी मूलद्रव्ये ज्यामध्ये एनपीके (प्रायमरी), कॅल्शिअम, मॅग्नेशिअम सल्फर (सेंकडरी) तसेच लोह, बोरॉन, थ्रिंक, कॉपर, अमोनिअम, मॉली या सूक्ष्म अन्नद्रव्यांची पाण्याच्या माध्यमातून पूर्तता केली जाते. या तंत्रज्ञानामुळे 90 टक्के पाण्याची बचत होते.