Friday, April 26, 2024
Homeकृषीऊसतोड मजुरांचे आंदोलन चिघळण्याच्या टप्प्यावर

ऊसतोड मजुरांचे आंदोलन चिघळण्याच्या टप्प्यावर

सातारा : कराड तालुक्यातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सन 2014-15 वर्षात केलेल्या कामाचे 22 कोटी रूपये मिळावेत, या मागणीसाठी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत असलेल्या ऊसतोड मुकादम व मजुरांचे आंदोलन चिघळण्याच्या टप्प्यावर पोहचले आहे़ गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कारखान्याचे कृषी अधिकारी, सहकार विभागाचे अधिकारी व आंदोलनकर्ते ऊसतोड मुकादमांच्या झालेल्या बैठकीत सकारात्मक तोडगा न निघाल्याने मनसेने शनिवारी मलकापूर (ता. कराड) येथील कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट कार्यालयासमोर बिरोबा मंदिर येथे ऊसतोड कामगारांसमवेत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे़ तर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या शनिवारी आंदोलनस्थळी भेट देणार असून आज साखर आयुक्तांच्या प्रतिनिधीसमवेत आंदोलनकर्ते ऊसतोड मुकादमांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे़
मागील 50 वर्षापासून य़ मो़ कृष्णा सह़साखर कारखान्यासाठी ऊस तोडणी व वाहतुकीचे काम करणार्‍या बीड जिल्ह्यातील ऊस तोडणी मजुरांनी सन 2014 -15 च्या गळीत हंगामात ऊस तोडणीचा करार केला होता़ तो हंगाम संपल्यानंतर तोडणी वाहतुकीचे व कमिशनची बिले अद्याप देण्यात आली नाहीत़ दरवर्षीपˆमाणे यंदाच्या वर्षीही कारखान्यावर करारासाठी गेलेले जे जुने मुकादम आहेत, त्यांना करार व टायर मिळणार नाहीत, असे सांगण्यात आले़ तसेच सन 2014-15 गळीत हंगामातील बिल नंतर देण्यात येईल, असे सांगण्यात आले़ परंतु यंदाचा गळीत हंगाम संपून ही देय रक्कम मिळत नाही, त्यामुळे ऊस तोडणी मुकादम व मजुरांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले़ उपोषणादरम्यान शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांनी भेट दिली़
उपोषणाच्या तिसर्‍या दिवशी बुधवारी 5 जणांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले़ गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कारखान्याचे शेतकी अधिकारी, सहकार विभागाचे अधिकारी व आंदोलनकर्ते ऊसतोड मुकादमांची बैठक झाली़ या बैठकीत देय असलेली रक्कम देण्याबाबत कोणताही सकारात्मक तोडगा निघाला नाही, त्यामुळे संतापलेल्या ऊसतोड मुकादमांनी थेट बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली़ ना़ मुंडे यांनी त्यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकूण श्‍निवारी आंदोलनस्थळी येण्याचे आश्‍वासन दिले़ तर मनसेचे कराड तालुका उपाध्यक्ष सतीश यादव यांनी शनिवार, द़ि 16 रोजी मलकापूर (ता. कराड) येथील कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यालयासमोरील बिरोबा मंदिरात ऊसतोड मजुरांना सोबत घेूवन आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला़ दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांनी या प्रश्‍नी गुरुवार, द़ि 15 रोजी साखर आयुक्त प्रतिनिधी व ऊसतोड मजूर व मुकादमांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली असल्याचे सांगितले़ तर आज होणार्‍या बैठकीत सकारात्मक तोडगा न निघाल्यास शनिवारी बीड जिल्ह्यातील हजारो ऊसतोड कामगार व वाहतूकदार सातारा येथे येतील व तीव्र्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ऊसतोड मुकादम बबन माने यांनी दिला़

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular