एफआरपी ऊस दर प्रश्नांवर ना. सदाभाऊंचे मौन

सातारा: यापूर्वीच्या सरकारच्या काळात शेतकर्‍यांना ऊसदरासाठी आंदोलने करावी लागली. त्यावेळी लाठी हल्ला, गोळीबार शेतकर्‍यांवर केला गेला. भाजप सरकारच्या चार वर्षाच्या काळात शेतकर्‍यांना एकदाही रस्त्यावर येऊन आंदोलन करावे लागले नाही. कांदा उत्पादक शेतकर्‍यांना 150 कोटींचे अनुदान सरकार देणार आहे, असे कृषि व पणन मंत्री ना. सदाभाऊ खोत यांनी सातारा येते सर्किट हाऊसवर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान एफआरपी नुसार अद्यापही एकाही साखर कारखान्यानी दर दिला नाही. सातारा जिल्ह्यात साखर कारखान्यांना एफआरपी प्रमाणे दर दयावाच लागेल. अशी स्पष्टोक्ती करणारे सदाभाऊ कारखान्यांवर कारवाई करणार का ? असा प्रश्न उपस्थित केला असता मात्र मौन झाले. जिल्हा स्तरिय व विभाग स्तरिय सीएम चषकाच्या उद्घाटन व बक्षीस वितरण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी कृषी राज्यमंत्री तथा सातार्‍याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. ते, साखरेचा एफआरपीचा दर सातार्‍यात एकाही कारखान्याने दिला नाही या प्रश्नावर सदाभाऊ खोत यांनी केंद्राने दोन वेळेला साखर कारखान्यांना दिलेल्या पॅकेजची आठवणं करून दिली.
2011-12 साली प्रमाणापेक्षा जास्त साखर उत्पादन होऊन दर कोसळल्याने शेतकर्‍यांवर आंदोलनाची वेळ आली होती . मात्र मोदी शासनाच्या काळात साडेबारा हजार कोटीचे दोन टप्प्यात पॅकेज व साखरेला 31 रूपये भाव देण्याची तयारी यामुळे शेतकर्‍यांवर आंदोलनाची वेळ आली नाही. यंदा प्रथमच राज्यात 2700 रूपये इतका जास्त एफआरपी दिला जात आहे.
काही कारखान्यांनी तो जाहीर सुद्धा केला आहे . जे कारखाने एफआरपी प्रमाणे दर देणार नाही त्यांच्यावर साखर आयुक्तांकडून कारवाया केल्या जातील . असे खोत यांनी स्पष्ट करत एफआरपी नक्की कधी मिळणार या प्रश्नावर थेट भाष्य टाळले . महाराष्ट्रात कांद्याला प्रतिकिलो दोन रुपये अनुदान, कांदा चाळीसाठी तब्बल 45 कोटी अनुदान , मालवाहतूकीसाठी प्रति ट्रक चाळीस हजार रुपये भाडे, व पणन विभागाकडून कांदा उत्पादकांना दीडशे कोटी रुपये देण्याचे नियोजन आहे असे खोत यांनी स्पष्ट केले . नाशिक येथे राज्यातील सर्वात मोठा कांदा हब रेल्वेने जोडणार असणार्‍या महत्वाकांक्षी प्रकल्पांची त्यांनी माहिती दिली. कांदा खरेदी संदर्भात निर्यात अनुदान पाच टक्कयावरून दहा टक्के करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सीएम चषक स्पर्धा दिनांक 7 ते 9 जानेवारी दरम्यान सातारा जिल्हा क्रीडा संकुल येथे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत सकाळी दहा वाजता सुरु होत आहे .आयुष्यमान भारत क्रिकेट, मेक इन इंडिया रांगोळी, सौभाग्य खो खो, उडान शंभर मीटर, मुद्रा योजना चारशे मीटर, इंद्रधनुष्य चित्रकला, शेतकरी सन्मान कब्बड्डी, कौशल्य भारत कार्यक्रम, स्वच्छ भारत कुस्ती, उजाला गायन स्पर्धा, उज्ज्वला नृत्य स्पर्धा, या स्पर्धा होणार आहे. 55000 ते 3000 अशी विजेते निहाय बक्षीसे दि 9 जानेवारी रोजी सायंकाळी4 वाजता सदाभाऊ खोत यांच्या हस्ते दिली जाणार आहेत. विजेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे .