स्वाभिमान दिवस साऱ्या महाराष्ट्राने साजरा करावा ; ज्येष्ठ इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे यांचे आवाहन ; जयघोषाने अजिंक्यतारा दुमदुमला, आठव्या स्वाभिमान दिनाला उदंड प्रतिसाद 

सातारा : छत्रपती शाहूंच्या काळात झालेला साम्राज्य विस्तार हा हिंदुस्थानाच्या इतिहासातील सर्वात मोठा व वैभवशाली आहे. गेल्या काही वर्षापासून आम्हाला आमचा अर्धवट इतिहास शिकवला. दिल्लीवर राज्य गाजवणारा आपला वंशज आहे, याचे भान मराठी माणसात जागे करायचे असायचे असेल तर स्वाभिमान दिवस साऱया महाराष्ट्राने साजरा करावा, असे आवाहन ज्येष्ठ इतिहासतज्ञ व गडकोट संवर्धन समितीचे मुख्य सल्लागार पांडुरंग बलकवडे यांनी केले.
छत्रपती शाहूंचा राज्याभिषेक दिन, राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व युवक दिन असा त्रिवेणी संगम असणाऱया या दिवसाला राजधानी साताऱयाच्या अजिंक्यतारा किल्ल्यावर अनन्यसाधारण महत्व असते. सातारा शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या स्वाभिमान दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी डॉ. संदीप महिंद गुरूजी, नगराध्यक्षा माधवी कदम, सुदामदादा गायकवाड, दीपक प्रभावळकर, सातारा हिल मॅरेथॉनचे डॉ. संदीप काटे, अमरदादा जाधव, अजय जाधवराव, सभापती यशोधन नारकर, पंचायत समिती सदस्य आशुतोष चव्हाण, सुजाता राजेमहाडिक, सागर राजेमहाडिक, दत्ताजी भोसले, अमृतसिंह चव्हाण, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक पोरे, कन्हैय्यालाल राजपुरोहित, सादिकभाई शेख, युवा करिअर ऍकॅडमीचे संचालक प्रा. विश्वास मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठयांची राजधानी असणाऱया अजिंक्यताऱयावर स्वाभिमान जागृत करणारी चळवळ निर्माण व्हावी हे माझे गेल्या 30 वर्षापासूनचे स्वप्न होते. मराठी साम्राज्याच्या सीमा साऱया आशिया खंडात पसरत होत्या तेव्हा छत्रपती शाहू हेच त्याचे केंद्रबिंदू ठरले. इतिहास निर्माण करणारी माणसे आज इतिहास विसरली आहेत. मराठयांनी एकदा-दोनदा नव्हे तर अनेकदा दिल्ली काबिज केली आहे. दिल्लीवर आलेली आक्रमणे मराठयांच्या घोडयांच्या टापा ऐकूणच पळून गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळेच स्वाभिमान दिवस हा केवळ सातारा शहराने नव्हे तर साऱया मराठी वर्षाने साजरा करण्याची गरज आहे.
अजिंक्यतारा हा शहरापासून जवळ असलेला राज्यातील एकमेव निसर्गसंपन्न किल्ला आहे. त्याच्या संवर्धनाकडे झालेले दुर्लक्ष अत्यंत वेदनादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. संदीप महिंद म्हणाले, मराठी शाहीचा इतिहास जागवण्याची साताऱयाने केलेली सुरूवात देशाच्या कानाकोपऱयात पोहोचवण्याची गरज आहे. आपल्या जयघोषात यापुढे साम्राज्यविस्तार छत्रपती शाहूंचा उल्लेख राहील, असेही त्यांनी आवर्जुन नमूद केले.
डॉ. संदीप काटे यांनी यावर्षी ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड निर्माण करणाऱया सातारा हिल मॅरेथॉनच्या राजधानी रनची रूपरेषा विषद केली.
छत्रपती शाहूंच्या कार्यकालाचे अभ्यासक अजय जाधवराव यांनीही त्यांच्या साम्राज्य विस्ताराचा धावता आढावा घेतला. गेल्या आठ वर्षापासून याच कार्यकालाच्या प्रचार आणि प्रसाराचा आपण वसा घेतल्याचे सांगितले.
नगराध्यक्षा माधवी कदम यांनी आठव्या सातारा स्वाभिमान दिवसाला शुभेच्छा देताना गेल्या वर्षीपासून या उपक्रमाची मी पाईक झाली आहे. किल्ल्याच्या संवर्धनासाठी पालिकेच्या माध्यमातून काम करायला मर्यादा येत असल्या तरी आम्ही व्यक्तीशः व मनाने काम करायला मर्यादा नाहीत. सातारा स्वाभिमान दिनाच्या पाठीशी आम्ही सर्व खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
शुक्रवारी पहाटे सुर्योदयापासूनच अजिंक्यतारा किल्ल्यावर शेकडो माणसांची लगबग सुरू झाली होती. किल्ल्याच्या महाद्वाराला तोरण बांधून दोन्ही बुरूजांना सुशोभित करण्यात आले होते. राजसदरेवर फुलांची सजावट करून आसनव्यवस्था करण्यात आली होती. भल्या पहाटेपासून सनई चौघडयाचे मंजूळ स्वर, शिवशंभो भक्तांची गर्दी व निनादणाऱया घोषणांनी मराठेशाहीचे वातावरण पुन्हा एकदा निर्माण झाले होते.
उपस्थित सर्वांना कार्यक्रमानंतर चहा, नाष्टयाची सोय करण्यात आली होती. उपक्रमासाठी उपस्थित असलेल्या शेकडो लोकांनी यानंतर अजिंक्यतारा किल्ला दर्शन केले. यात मंगळाई दर्शन, कडेलोट बुरूज, सातही तळी, सप्तेश्वर मंदिर, दक्षिण दरवाजा, दारूगोळा कोठार, कोठडी, हनुमान मंदिर, मुख्य बुरूज आदींचा समावेश होता. प्रत्येक ठिकाणाची ऐतिहासिक व शास्त्रोक्त माहिती घेत आठव्या सातारा स्वाभिमान दिनाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन दीपक प्रभावळकर यांनी केले. तर आभार शेखर तोडकर यांनी मानले. दरम्यान, यंदापासून विविध संघटनांनी अजिंक्यताऱयावर विविध उपक्रमांच्या माध्यमातून सातारा स्वाभिमान दिवस साजरा केला. सायंकाळी काही संस्थांनी श्रमदान केले.
चौकट करणे
…तर राजधानी सातारा पालिकेची
विशेष सभा किल्ल्यावर होणार
स्थानिक स्वराज्य संस्थांचे इतिहासाप्रती काही देणं असलं पाहिजे. शिवप्रतापदिनी सातारा जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा ज्याप्रमाणे प्रतापगडावर आयोजित केली जाते. त्याप्रमाणेच सातारा  स्वाभिमान दिनी पालिकेची सभा अजिंक्यताऱयावर आयोजित करावी यासाठी समिती गेल्या तीन वर्षापासून प्रयत्नशील असल्याचे दीपक प्रभावळकर यांनी सांगितले. यावर नगराध्यक्षांनी पालिकेच्या वतीने यासंदर्भात ठराव करून प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. याचाच धागा पकडत पांडुरंग बलकवडे म्हणाले, पुणे महानगरपालिकेच्या वतीने सिंहगडावर उदंड कार्य सुरू आहे. सातारा पालिका तसे प्रयत्न करणार असेल तर त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विशेष ठरावासाठी मी स्वतः पाठपुरावा करेन, असे आश्वासनही त्यांनी दिले.