…तर जरंडेश्‍वर शुगर मिल्सवर फौजदारी दाखल करणार : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

कोरेगाव : जिल्हाधिकारी सौ. श्‍वेता सिंघल व कोरेगावचे पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे यांच्यासमोर जरंडेश्‍वर शुगर मिल्सच्यावतीने सरव्यवस्थापक विजय जगदाळे यांनी 2900 रुपये पहिली उचल देण्याचे अभिवचन दिले होते, मात्र त्यांनी हा शब्द पाळलेला नसून, शेतकर्‍यांचे आतोनात नुकसान होणार आहे. याबाबत त्वरित निर्णय न घेतल्यास दि. 7 फेब्रुवारी रोजी फौजदारी गुन्हा दाखल करुन लोकशाही मार्गाने आंदोलन छेडणार आहे, असा इशारा तालुकाध्यक्ष जीवन शिर्के यांनी दिला आहे. 

याबाबत त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे, की जरंडेश्‍वर शुगर मिल्सने शेतकर्‍यांना पहिली उचल 2900 रुपये देण्याचे जाहीर केले होते. त्याचबरोबर शासनाच्या नियमाप्रमाणे गाळप झालेल्या ऊसाचे पेमेंट विहीत कालावधीत शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आश्‍वासन दिले होते, प्रत्यक्षात मात्र गेल्या दीड महिन्यांपासून शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर ऊस बिलाची रक्कम जमा झालेली नाही. शेतकर्‍यांच्या ऊस बिलाची व्याजासह रक्कम तातडीने बँक खात्यावर जमा करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
संघटनेचे तालुकाध्यक्ष जीवन शिर्के यांच्यासह शेतकर्‍यांनी मंगळवारी सकाळी जरंडेश्‍वर शुगर मिल्सवर जाऊन सरव्यवस्थापक विजय जगदाळे यांची भेट घेतली आणि त्यांना विविद मागण्यांचे निवेदन दिले. सातत्याने मागणी करुन देखील कारखान्याला शासनाने दिलेला अधिकृत गाळप परवाना व पर्यावरण दाखला देण्याची मागणी असल्याचे शिर्के यांनी स्पष्ट केले.
स्वाभिमानीच्या मागण्यांकडे व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्यास दि. 7 फेब्रुवारी रोजी जरंडेश्‍वर शुगर मिल्सवर फौजदारी गुन्हा दाखल करुन लोकशाही मार्गाने आंदोलन छेडणार असल्याचे शिर्के यांनी निवेदनामध्ये नमूद केले आहे.