महापुरात उडी मारणे व सेल्फी काढणे देतायत अपघातास निमंत्रण ; तरुणाईचा उत्साह बेतू शकतो जीवावर, सुरक्षेची जोखीम कुणाची

वाई : वाई शहराच्या मध्यावरून कृष्णामाई मोठ्या दिमाखात वाहत आहे. तिला गेल्या आठ दिवसांपासून महापूर आलेला आहे, बाहेरून येणारे पर्यटकांना सेल्फी काढण्याचा मोह आणि वाई शहरातील तरुणांना पोहोण्याचा मोह आवरता येत नाही, त्यासाठी अतिशय उंचावरून कृष्णा पुलावरून महापुरात गेल्या आठ दिवसांपासून उड्या मारण्याचा जीवघेणा खेळ चालू आहे. तो पाहण्यासाठी पर्यटकांसह स्थानिक नागरिक गर्दी करताना दिसत आहेत. उड्या मारणार्‍या तरुणांना त्यामुळे चेव येत असून ते पुराच्या पाण्यात वेगवेगळे जीवघेणे प्रयोग करताना दिसतायात. या बेधुंद तरुणाईला या ठिकाणी रोखणारे कोणीही नसल्याने त्यांच्या मर्कट लीला वाढतच चालल्या आहेत. महापुरात उंच ठिकाणाहून उड्या मारणे हे त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार चालू असून पालिका प्रशासनाला या पोलिसांना त्याचे काहीही पडलेले नाही तेही लोकांच्यातील होवूनच हा खेळ पहात आहेत. त्वरित पोलिसांनी अशा बेधुंद महापुरात मर्कट लीला करणार्‍या तरुणांना अडविणे आवश्यक असून त्यांच्यावर  योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे, अन्यथा एकदा मोठा अनर्थ झाल्यावरच अशा प्रकारच्या जीवघेण्या खेळावर प्रतिबंध लादणार का? वेळ निघून गेल्यावर आलेले शहाणपण काय कामाचे ! असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. वाई शहरात पूर्वी पट्टीचे पोहोणारे होते परंतु त्यावेळी कृष्णा नदीची भोगोलिक स्थिती वेगळी होती त्यावेळी दरवर्षी न चुकता नदीला महापूर येत असल्याने महापूर येण्याअगोदरच नदीतील असणारे अडथळे हटविण्यात येत असे सध्याची नदीची अवस्था पाहिल्यास महापुरात उंचावरून उडी मारून पोहोणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे आहे. मग हा जीवघेणा खेळ का? खेळायचा हेही लक्षात घेण्यासारखे आहे, परंतु आजकालच्या बेभान झालेल्या तरुणाई पुढे कोणाचे काहीही चालत नाही. त्यांना चांगले सांगून पटत नाही कायद्याची भाषा त्यांना चांगली समजते. तरी पालिका प्रशासनाने एकदा चुकीचा प्रसंग घडण्या अगोदर पोलिसांच्या मदतीने सेल्पी काढणे महापुरात उंचावरून उड्या मारणे यावर त्वरित पायबंद घालावा अशी मागणी वाईकर नागरिक करीत आहेत. सध्या कृष्णा नदीला अतिशय स्वच्छ आणि निर्मळ पाणी अतिशय वेगाने वाहताना दिसत आहे, ते पाहायला चांगले असले तरीही त्यात चुकीच्या पद्धतीने पोहोणे योग्य नाही, तरी मोठा अपघात होण्यापेक्षा आपली आपणच काळजी घेणे गरजेचे आहे. घरी आपले कोणीतरी वात पहात असेल याची जाणीव तरुणांनी अवश्य ठेवावी.
कॅप्शन-वाईतील कृष्णा नदीच्या पुलावरून पाण्यात पोहण्यासाठी उडी घेताना तरूण मुले व नदीला आलेला महापूर.

– महापुरात पोहोण्यात झोपडपट्टीतील तरुणांचा मोठा सहभाग
वाई शहरात राजकीय उदासीनतेमुळे झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात     विखुरलेली आहे. या झोपडपट्टीतील तरुणांना योग्य मार्गावर आणण्यासाठी वाई तील अनेक संघटना कार्यरत आहेत. त्यात त्यांना यश न आल्याचे चित्र या निमित्ताने दिसत आहे. तरी आपला बहुमुल्य वेळ अशा विचित्र कारणांसाठी वाया न घालविता योग्य मार्गाने मार्गक्रमण केल्यास आपल्या जवळच्या लोकांना नकोत्या दुखःला सामोरे जावे लागणार नाही.: एक सुज्ञ नागरिक