महाबळेश्‍वर येथे काळी पिवळी टॅक्सी संघटनेने टॅक्सी बंद व धरणे आंदोलन

महाबळेश्‍वर ः ऑल इंडीया परमीट असलेल्या टुरीस्ट टॅक्सी संघटना व स्थानिक काळी पिवळी टॅक्सी संघटनेतील वाद सोडविण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील तोडगा मान्य न झाल्याने येथील काळी पिवळी टॅक्सी संघटनेने टॅक्सी बंद आंदोलन व बस स्थानका समोर असलेल्या टॅक्सी कार्यालया जवळ धरणे आंदोलन सुरू केल्याने शहरातील वातावरण चांगलेच गरम झाले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवु नये म्हणुन पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे.
राज्यात सर्वत्र टॅक्सी परमीट मिळते. मात्र त्याला अपवाद सातारा जिल्हा राहीला आहे सातारा जिल्हयात टॅक्सी परमिट बंंद ठेवण्यात आले आहे. यामुळे येथील ऑल इंडीया परमिट असलेल्या टुरीस्ट टॅक्सीची संख्या वेगाने वाढली आहे. या टुरिस्ट टॅक्सी चालकांनी देखील आपली संघटना तयार केली आहे. नव्याने झालेली ही टुरीस्ट टॅक्सी संघटना व येथील पारंपारिक काळी पिवळी टॅक्सी चालकांची महाबळेश्‍वर स्थानिक टॅक्सी संघटना मध्ये व्यवसाया वरून वाद सुरू झाले हे वाद सोडविण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने येथे नेहमी या दोन संघटनांच्या सभासदांमध्ये वाद निर्माण होत आहेत. काही दिवसांपुर्वी मेट गुताड येथे टुरीस्ट टॅक्सी चालकांनी ग्रुप बुकिंग करून त्यांना महाबळेश्‍वर दर्शन साठी घेवुन जायचे नाही असा दम देत काळी पिवळी टॅक्सी चालकांनी टुरीस्ट वाहनातील पर्यटकांना जबरदस्तीने खाली उतरविले व त्यांना टॅक्सीने महाबळेश्‍वर दर्शन करण्यास भाग पाडले. तेव्हा जोरदार वादावादी झाली होती. काळी पिवळी टॅक्सी चालकांच्या या दादागिरीने टुरिस्ट टॅक्सी व्यवसायिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. त्या वेळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली परंतु पोलिसांनी या मध्ये काही ठोस भुमिका घेतली न गेल्याने या वाद सुटला नाही. दोन दिवसांपुर्वी पुन्हा मेट गुताड या गावाप्रमाणेच प्रकार घटला ली मेरीडीयन या तारांकित हॉटेल मधील पर्यटक टुरीस्ट टॅक्सी मधुन महाबळेश्‍वर दर्शन साठी निघाले होते. परंतु हा गु्रप घेवुन जाण्यास काळी पिवळी टॅक्सी संघटनेने मज्जाव केल्याने पुन्हा या दोन संघटनां मध्ये जोरदार वादावादी झाली. या बाबत टुरीस्ट टॅक्सी चालकांनी पोलिस ठाण्यात चौघां विरोधात तक्रार दाखल केली या तक्रारी वरून पोलिसांनी खबरदारीचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन संबंधित चार चालकांना कलम 149 नुसार नोटीस बजावुन कायदा हातात घेवु नये अशी ताकिद दिली अशी ताकिद दिली. तरी आज पुन्हा काळी पिवळी टॅक्सी चालकांनी टुरीस्ट वाहनांना गु्रप घेवुन महाबळेश्‍वर दर्शन करण्यास मज्जाव केला. वारंवार होणारे या प्रकाराने दोन्ही बाजुच्या लोकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. हा वाद पेटणार इतक्यात पोलिस घटना स्थळी दाखल झाली तरी देखिल दोन्ही संघटना मधील बाचाबाची सुरूच होती. तुला पाहुन घेतो तुला सोडणार नाही अशा धमक्या देण्याचे प्रकार येथे सुरूच होते या चकमकीचे पोलिसांनी चित्रण केले आहे.
हा वाद मिटण्याऐवजी अधिक चिघळत चालल्या मुळे येथील सहा.पो. निरीक्षक एम एस निंबाळकर यांनी तातडीने उपविभागीय पोलिस अधिकारी यांना या बाबत माहीती दिली. त्या नुसार उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके हे महाबळेश्‍वर येथे आले व त्यांनी तातडीने दोन्ही संघटनांच्या पदाधिकारी यांचे बरोबर बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकुन घेतल्या नंतर त्यांनी सांगितले. ही वाहतुकीचे नियम हे दोन्ही टॅक्सी चालकांना सारखेच असुन ते दोन्ही संघटनांना बंधन कारक आहेत. या बाबत कोणीही कायदा हातात घेवुन पर्यटकांना वेठीस धरू नये. वाहतुक नियमांचे कोणी उल्लंघन करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर कोणाचीही गय केली जाणार नाही. कायदा मोडणारे यांचेवर विनाविलंब गुन्हा दाखल केला जाईल. कोणी कसा धंदा करावा या बाबत परीवहन विभागाने नियम व कायदे केले आहेत त्या नुसार टॅक्सी संघटनेने व्यवसाय करावा पर्यटकांना वाहनातुन उतरवुन कोणी कायदा मोडण्याचा प्रयत्न केला तर पोलिस अशी गुंडागर्दी खपवुन घेणार नाही अशी तंबी दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी दिलेल्या निर्णया मुळे टुरीस्ट टॅक्सी संघटनेने स्वागत केले. मात्र काळी पिवळी टॅक्सी चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके यांनी या बैठकीत जो तोडगा सुचविला तो काळी पिवळी टॅक्सी संघटनेला पटला नाही. तो त्यांच्या सभासदांच्या हिताचे आड येणारा वाटला. तसेच पोलिसांनी दिलेल्या निर्णया मुळे काळी पिवळी टॅक्सी चालकांच्या व्यवसायांचे विभाजन झाल्याची भावना बळावल्याने त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपासण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी तातडीने प्रमुख पदाधिकारी यांची बैठक घेवुन अन्याया विरोधात लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यांना तातडीने बंद पुकारला व धरणे आंदोलन सुरू केले. आज पासुन काळी पिवळी टॅक्सी बेमुदत बंद राहणार टॅक्सी संघटनेच्या 398 सभासदांनी या बंद मध्ये सहभाग घेतला असल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय होणार आहे. टुरीस्ट टॅक्सी या आपला व्यवसाय चालुच ठेवणार आहे.