शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षकांशी संवाद साधून त्यांचाच तास घेतला

सातारा : मंत्र्यांचा दौरा म्हटलं की तास-दोन तासांची प्रतीक्षा ठरलेली असते; पण सातार्‍यात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षकांसह सर्वांनाच धक्का दिला. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी ते अर्धा तास कार्यक्रमस्थळी पोहोचले. शिक्षकांशी संवाद साधून मंत्री तावडे यांनी त्यांचाच तास घेतला.
सातारा येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात बुधवारी शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे राज्य शिक्षक पुरस्काराचा वितरण सोहळा आयोजित केला होता. कार्यक्रम सकाळी अकरा वाजता नियोजित होता. त्यामुळे सभागृहात फारशी गर्दी नव्हती. शासकीस विश्रामगृहातून बाहेर पडल्यावर मंत्री तावडे यांच्या गाड्यांचा ताफा कार्यक्रमस्थळी धडकला.
सभागृहात फार गर्दी नसल्यामुळे तावडे यांनी शिक्षकांबरोबर संवाद साधायला सुरुवात झाली. यावेळी त्यांनी शिक्षकांच्या समस्या आणि सूचना जाणून घेतल्या. सुमारे अर्धा तास या गप्पा रंगल्या.
खासगी शिकवण्याशिवाय आम्ही मोठे झालो
शिक्षणाला भाषेचे कुंपण लावून बुद्धिमत्ता येत नाही. कोणत्याही मोठ्या शाळेची झूल नाही अन् खासगी शिकवणीशिवाय शाळेचं शिक्षण घेतलं. मराठी माध्यमाच्या शाळेने आम्हाला भाषेचा स्वाभिमान दिला. या भाषेत अभिनेते आदेश बांदेकर, पुष्कर श्रोत्री, भरत जाधव यांच्या शालेय आयुष्याचा प्रवास उलगडला.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, तसेच जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांचे सभापती, जि. प. सदस्य व जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे शिक्षक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.