कोरोना बाधित पत्रकारांच्या उपचाराचा खर्च आणि नुकसान भरपाई माध्यम समुहांनी द्यावा ; मराठी पत्रकार परिषदेची मागणी.

मुंबई :- मुंबईतील ५३ पत्रकारांना झालेली कोरोनाची लागण ही बाब चिंताजनक असून हे पत्रकार ज्या माध्यमांत काम करीत आहेत त्या दैनिकाच्या किंवा टीव्हीच्या मालकांनी संबंधित पत्रकारांच्या उपचाराचा खर्च करावा, नुकसान भरपाई ध्यावी आणि या तसेच अन्य पत्रकारांचे किमान ५० लाख रूपयांचा विमा उतरावा अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी आज केली आहे.
मुंबईत १६८ पत्रकारांची कोरोना चाचणी केली असता त्यातील ५३ पत्रकार पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे.. हे सर्व पत्रकार आपल्या दैनिकासाठी किंवा टीव्हीसाठी वार्तांकन करीत असताना त्यांना कोरोनाची लागण झालेली असल्याने त्याच्यावरील उपचाराची पूर्ण जबाबदारी संबंधीत माध्यम समुहाची आहे.. त्यामुळे पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांचा सारा खर्च माध्यम समुहांनी करावा अशी मागणी परिषदेने केली आहे. .. मुख्यमंत्र्यांनी संबंधित समुहाला तसे आदेश द्यावेत अशी मागणीही परिषदेने सरकारला पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
विविध मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे पत्रकार दिवस रात्र बातम्या आणि जाहिराती आपल्या दैनिकाला मिळवून देत असतात. किंबहुना त्यांच्या जिवावरच माध्यमांचा डोलारा उभा असतो. अशा स्थितीत स्टिंजर अथवा पूर्ण वेळ पत्रकार या महत्वाच्या घटकाला व्यवस्थापनाला वारयावर सोडता येणार नाही. त्यामुळे मालकांनी आपल्या माध्यमांशी जोडलेल्या सर्व पत्रकारांचा किमान ५० लाख रूपयांचा विमा उतरावा अशी मागणी देखील देशमुख यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रकावर एस.एम.देशमुख, किरण नाईक, गजानन नाईक, शरद पाबळे, संजीव जोशी, विजय जोशी आदि पदाधिकारयंच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रमुख माध्यम समुहांना देखील परिषदेच्यावतीने या अर्थांची निवेदने पाठविण्यात येणार आहेत.