राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत सातारा जिल्ह्यास उपविजेतेपद 

सातारा : राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा 2017 वाळवा जि.सांगली येथील हुतात्मा संकुल मैदानावर संपन्न झालेल्या 44 व्या राज्यअजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत सातारा जिल्हा उपविजयी ठरला. महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हे या स्पर्धेत सहभागी झाले होते. गतवर्षीच्या राज्य अजिंक्य स्पर्धेतही हा संघ उपविजयी ठरला होता.
सातारा जिल्हा मुलींच्या संघाने गटसाखळीत नांदेड जिल्हा संघावर 52 गुणांनी, नाशिक संघावर 34 गुणांनी तर अहमदनगर जिल्हा संघावर 32 गुणांनी मात करीत कोल्हापूर जिल्हा संघासोबत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत कोल्हापूर संघावर 30 गुणांनी मात करीत अंतीम फेरी गाठली.
अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात पुणे जिल्हा विरूद्ध सातारा जिल्हा मध्यंतपर्यंत सातारा 9 तर पुणे 11 गुणांवर होता. सोनाली हेळवीचा चतुरस्त्र खेळ पुण्याच याखेळाडू थोपवू शकत नव्हत्या.
सोनालीने संपूर्ण सामन्यात पुण्याच्या संघातून 14 गुण वसूल केले तिला नैनिका भोई, काजल सावंत, वैष्णवी खळदकर, पल्लवी डांगरे, ऐश्‍वर्या गिरीगोसावी, भाग्यश्री तिताडे यांनी सुरेख साथ दिली. अंतिम गुणफलक सातारा 20 तर पुणे 24 अशा अवघ्या 4 गुणानी सातारा जिल्हा पराभूत झाला.
सातारा जिल्हा संघास राष्ट्रीय कब्बडीपट्टू समीर थोरात यांचे मार्गदर्शन लाभले तर संघव्यवस्थापक म्हणून शिवप्रसाद उथळे यांनी काम पाहिले. सातारा संघामध्ये मानसी पाटणे, राजश्री गुजर, अनुजा जाधव यांचा देखील समावेश होता.
सातारा जिल्हा संघाला या कामगिरीबद्दल खा.श्री.छ. उदयनराजे भोसले, आ.श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शुभेच्छा दिल्या तर जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष गुरूवर्य बबनराव उथळे, सचिव संग्राम उथळे, उपाध्यक्ष उत्तमराव माने, शशिकांत यादव, संजय पवार, विजय आगटे, नारायणदास दोशी आदींनी सातारा जिल्हा कब्बडी असोसिएशनच्या वतीने अभिनंदन केले.