श्री.छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय अद्ययावत करण्याचे काम मार्च 2021 अखेर पूर्ण होणार -: पालकमंत्री बाळासाहेब पाटील

सातारा दि : 29 ( जि मा का ) छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे राज्याच्या नव्हे तर देशाच्या अभिमानाचा केंद्रबिंदू आहे. तो जाज्वल्य इतिहास जनतेसमोर यावा याकरिता श्री. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय अद्ययावत करण्यासाठी आणि पूर्णत्वासाठी 12 कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाने अर्थसंकल्पिय तरतूद करून दिला आहे. त्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असून मार्च 2021 पूर्वी पूर्ण केले जाणार असल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
श्री. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात सुरु असलेल्या कामाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत आ.छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, अधिक्षक अभियंता शरद राजभोज, कार्यकारी अभियंता शंकर दराडे, या संग्रहालयाचे पुरातत्व विभागाचे सहायक अभिरक्षक अभिरक्षक उदय सुर्वे, या संग्रहालयाचे वास्तू विशारद विजय गजबर उपस्थितीत होते.
या वस्तू संग्रहालयात तळमजला व पहिल्या मजल्यावर वस्तू संग्रहालयाच्या प्रदर्शनासाठी मोठमोठी दालने, व्हरांडे, कार्यालयीन जागा, इमारतीच्या पूर्व भागातील तळघरात पार्किंगची व सभागृहाची सोय केलेली आहे. या सर्व बाबी जाणून घेऊन काही बदल पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी करायला सांगितले. यावेळी आ.छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनीही काही बदलाच्या सूचना केल्या.
पर्यटकांच्या बसेससाठी पार्किंगची व्यवस्था, स्वच्छतागृह, तिकीट घर हे बस स्टँडच्या बाजूच्या रोड लगत करण्यात आले असून पर्यटकांसाठीचे प्रवेश द्वारही त्याच बाजूला असणार आहे. याचे सर्व बांधकाम युद्ध पातळीवर सुरु असल्याची माहिती राजभोज यांनी दिली. शिवकाल उभं करण्यासाठी संपूर्ण अभ्यास करण्यात आला असून महाराजांच्या आरमारापासून शस्त्रास्त्र, नाणे इथं पर्यंतची माहिती विविध रूपात इथे दाखविण्यात येणार असल्याचे विजय गजबर यांनी यांनी यावेळी सांगितले.