काम झालं खास ….आता पावसाची आस ; पाणीदार गावांसाठी श्रमदान ; तिसर्‍या वॉटर कप स्पर्धेची सांगता

सातारा : गेल्या 45 दिवसांपासून सुरू असणार्‍या तिसर्‍या वॉटर कप स्पर्धेची सांगता मंगळवारी मध्यरात्री बाराला झाली. श्रमदान व यंत्रांच्या माध्यमातून जलसंधारणाचे मोठे काम झाले असून, आता फक्त वरुणराजाची प्रतीक्षा लागली आहे. पावसाळ्यात साठणार्‍या या पाण्यातून दुष्काळी भागातील माळरानावर भविष्यात फळबागा डोलताना पाहावयास मिळणार आहे.
गेल्या तीन वर्षांपासून अभिनेता अमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने राज्यात वॉटर कप स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेमुळे दुष्काळी गावे पाणीदार होत आहेत. हे चित्र पाहून यंदाच्या या तिसजया स्पर्धेत राज्यातील 70 हून अधिक तालुके उतरले होते. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश आहे. माण, खटाव आणि कोरेगाव या दुष्काळी तालुक्यातील जनतेने दुष्काळ हटविण्याचा घेतलेला निर्णय सर्वस्वी फायदेशीर ठरलेला आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा 150 हून अधिक गावांनी स्पर्धेत सक्रिय सहभाग घेतला. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात सकाळपासून दुपारपर्यंत लोकांनी श्रमदान केले.
त्या माध्यमातून डीपसीसीटी, नालाबांध, बांधबंदिस्त, छोटे बंधारे, गॅबियन बंधारे आदी कामे करण्यात आली. मात्र, स्पर्धेचा कालावधी संपत येऊ लागला तसतसा श्रमदानाने वेग घेतला. काही गावांनी तर सकाळ व सायंकाळच्यावेळी श्रमदान करण्यास सुरुवात केली. तर काहींनी झालेल्या कामाचे मोजमाप रात्रीच्या सुमारासही केले. हे सर्व कष्ट होते ते पाणीदार गावासाठी.
वॉटर कप स्पर्धा संपली असून, आता परीक्षण व इतर कामे होणार आहेत. या स्पर्धेचा निकाला लागायला किमान दोन महिने जाणार आहेत. आता स्पर्धेत सहभागी गावांना पावसाची आस लागली आहे. कारण पाणी अडविण्याचे काम मोठ्या प्रमाणात झाले आहे.या कामाच्या ठिकाणी पाणी साठण्यासाठी दमदार पाऊस आवश्यक आहे. यावर्षी चांगला पाऊस झाल्यास सर्वच ठिकाणी पाणीसाठा होऊन जमिनीतील पाणीपातळी वाढणार आहे. त्याचा फायदा गावाची टंचाई दूर होणार आहे. तसेच आजही या दुष्काळी भागातील माळरानावरील शेकडो एकर जमीन पडीक आहे. ही जमीनही पाणी उपलब्ध झाल्यास बागायताखाली येऊ शकते. माळरानावर फळबागा डोलू शकतात. त्यासाठीही लोकांचे प्रयत्न सुरू आहेत.सातारा जिल्ह्यात वॉटरकप स्पर्धेत शेकडो गावांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेची सांगता मंगळवारी झाली. काही तासच शिल्लक असल्याने मोठ्या संख्येने गावकरी श्रमदानात सहभागी झाले होते. गावोगावी उठलेले तुफान मंगळवारी शमलं; पण दुष्काळ निवारणाची जिद्द संपलेली नाही.