तोरणे दाम्पत्य साजरा करते अनोखा साऊ – जिजाऊ जन्मोत्सव

म्हसवड : जानेवारी महिन्याचे महाराष्ट्राच्या इतिहासात वेगळे महत्व आहे. 3 जानेवारी हा पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीमाई फुले यांचा जन्मदिवस तर 12 जानेवारी हा राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस आहे. या दोन्ही तारखांना महाराष्ट्रभर वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे दोन्ही महामातांची जयंती साजरी केली जाते. मात्र म्हसवड येथील उपक्रमशील शिक्षक कैलास तोरणे आणि त्यांच्या पत्नी सुदर्शना मात्र हा जन्मोत्सव 3 जानेवारी ते 12 जानेवारी असा दहा दिवस घरगुती पद्धतीने गेली 3 वर्षे साजरा करत आहेत.
या उत्सवाची सुरुवात ते 3 जानेवारी या दिवशी सावित्रीमाई फुले आणि जिजाऊ यांच्या प्रतिमांची स्थापना करुन करतात. दररोज सकाळ – संध्याकाळी प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन सावित्री वंदना व जिजाऊ वंदना घेतली जाते. कुटुंबातील व आजूबाजूची मुले बोलावून त्यांना दररोज एका महान भारतीय स्त्रीची माहिती सांगितली जाते. यामध्ये सावित्री, जिजाऊ यांच्याबरोबरच आम्रपाली, अहिल्यादेवी होळकर, झलकारीबाई, ताराराणी, डॉ. रुखमाबाई राऊत, फातिमा शेख, रमाई आंबेडकर, मुक्ता साळवे या महान भारतीय स्त्रियांच्या त्यागाच्या आणि कर्तृत्वाच्या कथा सांगितल्या जातात. याबद्दल बोलताना सुदर्शना तोरणे म्हणाल्या की, राजमाता जिजाऊंमुळेच छत्रपती शिवराय घडले. आणि शिवरायांमुळेच महाराष्ट्र घडला. तर सावित्रीमाईंच्या त्याग आणि कष्टामुळेच भारतीय स्त्रियांना शिक्षणाची कवाडे खुली झाली. या दोन्ही महामातांचा जन्मोत्सव दहा दिवस साजरा करुन त्यांना अभिवादन केल्याचं वेगळं समाधान मिळतं.
हा जन्मोत्सव साजरा करणारे कैलास तोरणे आदर्श प्राथमिक शिक्षक म्हणून परिसरात ओळखले जातात. म्हसवड नंबर 3 शाळेत ते ज्ञानदानाचे काम करत असून, अनेक स्पर्धा परीक्षेत त्यांचे विद्यार्थी चमकत असतात. तसेच सामाजिक कार्यातही ते सक्रिय आहेत.
या उत्सवाबद्दल बोलताना ते म्हणाले की या महामातांचे जयंती उत्सव चौकात साजरे होतात. पण महाराष्ट्राची येणारी पिढी सुसंस्कृत घडवायची असेल तर या महामातांचे विचार घराघरात रुजवावे लागतील. त्यासाठी हा जन्मोत्सव महाराष्ट्रातील घराघरांत साजरा व्हायला हवा. या जन्मोत्सवास परिसरातील अनेक मान्यवर भेट देत असून उद्या 12 जानेवारी रोजी छोटेखानी समारंभात या जन्मोत्सवाची सांगता होणार आहे.