स्वच्छता मोहिमेत पर्यटकांचा सहभाग महत्वाचा: नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे

महाबळेश्वर : 12  केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 साठी पालिका अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत असून या स्वच्छता मोहिमेत पर्यटकांचा सहभाग वाढावा या उद्देशाने महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व नगरसेविकांनी नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेक येथे पर्यटकांना स्वच्छतेबाबत जनजागृती केली तसेच पालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कागदी पिशव्यांचे वाटप देखील पर्यटकांना करण्यात आले यावेळी येथे कुटुंबियांसह पर्यटनासाठी आलेल्या पाटणचे  शि वसेना आ शभुराज देसाई यांनी स्वच्छता मोहिमेचे कौतुक केले.
जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरला वर्षाकाठी देश विदेशातून लाखो पर्यटक भेटी देत असतात सध्या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने पर्यटक महाबळेश्वरनगरीत दाखल होत आहेत. येथील निसर्गसौंदर्यासोबतच, गुलाबी थंडीवर पर्यटक फिदा होत असून स्वच्छ, सुंदर, हरित महाबळेश्वर पाहून पर्यटकांमधून समाधान व्यक्त होत आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण साठी पालिका नवनवीन फंडे वापरत आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये पालिकेने राज्यातच नव्हे तर देशपातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली असून शहरातील मुख्य चौक, रुग्णालय परिसर, शाळा, बस स्थानक या व अश्या ठिकाणी स्वच्छतेचे संदेश, सर्वत्र स्वच्छताविषयक भिंतीचित्र रेखाटण्यात आली आहेत शहरात देखील ध्वनिक्षेपकाद्वारे स्वच्छतेविषयक नागरिकांसह पर्यटकांना आवाहन करण्यात येत आहे.
पालिकेच्या नगराध्यक्षांसह, नगरसेवक पालिका अधिकारी, कर्मचारी स्वच्छ, सुंदर, हरित व प्लास्टिक मुक्त महाबळेश्वर साठी नागरिकांसह पर्यटकांमध्ये स्वतः रस्त्यावर उतरून जनजागृती करताना पाहावयास मिळत आहेत. प्राथमिक शाळा, हायस्कुल व महाविद्यालय देखील शहरात स्वच्छतेविषयक पथनाट्ये सादर करून स्वच्छतेचा संदेश देत आहेत.
शहरात सकाळी तसेच रात्रीच्या वेळी शहर व परिसराची स्वच्छता सुरु असून रस्त्यावर थुंकणार्‍यास, कचर्‍याचे वर्गीकरण न करणार्‍यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.पालिकेच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्यासह नगरसेविकांचा गट प्रत्येक प्रभागांमध्ये घरोघरी जाऊन नागरिक महिलांना स्वच्छतेचे महत्व पटवून देत असून या माध्यमातून त्यांच्या समस्या देखील सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत.पालिकेने घेतलेल्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला व्यापारी व्यावसायिकांकडून  उत्तम प्रतिसाद मिळत असून कागदी प्लास्टिक पिशव्यांचा वापर व्यापार्‍यांनी सुरु केला आहे. पालिकेने बचत गटांना प्रोत्साहन देत त्यांच्या माध्यमातून कागदी पिशव्या बनविण्यात येत आहेत. महाबळेश्वरचे संपूर्ण अर्थकारण ज्यांच्यावर अवलंबून आहे अश्या पर्यटकांमध्ये सुद्धा प्लास्टिक मुक्ती व स्वच्छतेविषयी संदेश देण्यासाठी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व नगरसेवक नगरसेविका येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळी भेट देत पर्यटकांमध्ये स्वच्छतेचा संदेश पोहचविण्याचे काम करीत आहेत महाबळेश्वरचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या व पर्यटकांचे आकर्षण असलेल्या प्रसिद्ध वेण्णालेक येथे नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे महिला व बालकल्याण सभापती स्नेहल जंगम,नगरसेविका सुनीता अखाडे, अफ्रिन वारुणकर यांनी पर्यटकांशी महाबळेश्वर विषयी संवाद साधून स्वच्छतेविषयी आपणा पर्यटकांचा सुद्धा सहभाग किती महत्वाचा आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.
यावेळी पर्यटकांनी देखील या स्वच्छता मोहिमेचे कौतुक करून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. येथील वेण्णालेक नाक्यावर प्रवेश करणार्‍या पर्यटकांचे स्वागत नगराध्यक्षा व नगरसेविका करीत होत्या व या पर्यटकांना प्लास्टिक मुक्तीसाठी कागदी पिशव्यांचे वाटप करून स्वच्छ सुंदर महाबळेश्वर मध्ये आपला सहभाग किती महत्वाचा आहे याबद्दल जागृती करीत होत्या. महाबळेश्वर विषयी आपुलकी व प्रेम असणारे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यावेळी आपल्या कुटुंबियांसमवेत वेण्णालेक येथे आले असता नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व नगरसेविकांनी भेट घेत स्वच्छता मोहिमेविषयी त्यांना माहिती दिली आ.शंभूराज देसाई यांनी देखील आपण शहरात फिरताना येथील स्वच्छता पाहून आनंद व समाधान वाटले असे सांगून स्वच्छता मोहिमेचे विशेष कौतुक केल.