पंताच्या साक्षीने जिल्हा परिषद मैदानावर वृक्षतोड

सातारा : वृक्षतोडीच्या घटना जिल्ह्यात नव्या नाहीत, पण प्रशासन किती निर्ढावलेले आहे हे जिल्हा परिषदेच्या मैदानावरील लावलेली सुमारे 15 झाडे पार्किंगसाठी तोडल्यामुळे स्पष्ट होत असल्याने बांधकाम विभागाच्या विष्णुपंत साळुंखेंना निलंबित करण्याची मागणी विहिंपच्या वाडकर यांनी निवेदनाद्वारे जिप.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे.
खाजगी कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या मैदानावर विद्युत रोषणाईसह पार्किंग व्यवस्था मक्तेदाराकडून करण्यात आली. मात्र, यावेळी मैदानावर वृक्षप्रेमी आणि प्रशासनाने लावलेली झाडे तोडण्यात आल्याचे बुधवारी दि. 14 मार्च रोजी सकाळी काही नागरिकांच्या लक्षात आले. यावेळी मक्तेदाराने नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देत रफादफा केले असले तरी बांधकाम विभागाच्या साळूखेंनी मक्तेदाराला पाठीशी घालण्याचे काम केले आहे. म्हणूनच सुमारे 8 ते 10 फुट वाढलेली झाडे तोडूनही कारवाई करण्यात आलेली नाही. उलट तोडलेली झाडे पुन्हा लावण्यात येतील, झाले-गेले विसरण्याचा अजब सल्ला नागरिकांना देण्यात आला. विरोध करणार्‍या नागरिकांनी वृक्षतोडीबाबत कारवाईची मागणी केल्यानंतर दमदाटीचा प्रकारही करण्यात आला असून वृक्ष संवर्धनाचा नारा देणारे प्रशासन अधिकार्‍याला पाठीशी घालत कागदी घोडे नाचवणार, का कर्तव्यात कसूर करणार्‍या साळुंखेंना निलंबित करून तोडीफ करणार्‍यांवर गुन्हे दाखल करणार? असा सवाल वाडकरांनी निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे.
– दिड वर्षांपूर्वी प्रशासन आणि नागरिकांनी खडे खोदून सुमारे 60 झाडे लावलेली असताना त्यापैकी सुमारे 15 झाडे ते 10 फुट उंच झाले होती. या झाडांना पाणी देण्यासाठी मैदानावर नळ कनेक्शन सुरु आहे. आता ही झाडेच तोडल्यामुळे सकाळी फिरायला येणारे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.