सरकारने देशातील विषमता कमी करावी, अन्यथा सामाजिक उद्रेक होईल : डॉ. निरगुडकर

 कराड : देशात सर्वच क्षेत्रात विषमता निर्माण झाली आहे. ही विषमता कमी करण्याचे काम विद्यमान सरकारने करावे अन्यथा देशात सामाजिक उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा डी.एन.ए. व झी चोवीस तास दूरचित्रवाहीनीचे संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी दिला.
सातारा जिल्हा, कराड तालूका व शहर काँग्रेसच्या वतीने येथील वेणूताई चव्हाण सभागृहात स्व. आनंदराव व प्रेमलाकाकी चव्हाण यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. निरगुडकर प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण होते. कार्यक्रमास आ. आनंदराव पाटील, किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मदनदादा भोसले कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते, कराड न.पा.च्या अध्यक्षा  संगिता देसाई, मलकापूर न.पं.च्या नगराध्यक्षा कल्पना रैनाक, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, कराड न.पा.च्या विरोधी पक्ष नेत्या स्मिता हुलवान, युवा नेते रणजितसिंह नाईक-निंबाळकर, भाई पंजाबराव चव्हाण, महिला जिल्हा अध्यक्षा धनश्री महाडिक, माजी नगराध्यक्षा सौ. अर्चना पाटील, मनोहर शिंदे, अशोक पाटील, अविनाश नलवडे, अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, दिलीप जाधव इत्यादी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
डॉ. निरगुडकर पुढे म्हणाले, देशात तरुणांची संख्या मोठी आहे. हे तरुण शिक्षण घेवून मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत, मात्र त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे त्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. कोणत्या प्रकारचे शिक्षण हवे यावर निश्‍चिती नाही, श्रीमंत-गरिब अशी मोठी दरी निर्माण झाली आहे. देशात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले आहे. विद्यापीठांचे कुलगुरु शिक्षणाविषयी सुधारणा करायला व तसे बोलायला तयार नाहीत. असे एक ना अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. हे राज्यकर्त्यांच्या पुढचे मोठे आवाहन आहे. या आवाहनांचा राज्यकर्त्यांनी वेळीच विचार न केल्यास सर्वत्र आराजकता माजल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषनात आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्यातील दुष्काळी परिस्थिती हाताळायला सरकारला अपयश आले आहे. राज्यातील पाण्याचा प्रश्‍न व सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उद्योजक महाराष्ट्रात यायला तयार नाहीत. त्यामुळे युवा पिढीच्या हाताला काम नाही. 1988 साली सरकारने वनधोरण स्विकारले. मात्र त्यास म्हणावे तसे यश आले नाही.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ. आनंदराव पाटील यांनी केले. कार्यक्रमास कराड व सातारा जिल्ह्यातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.