आम्ही खासदार, आमदार असलो, तरी जनतेचे कारकून आहोत

कोरेगाव : आम्ही खासदार, आमदार असलो, तरी जनतेचे कारकून आहोत. आमच्यामुळे जनता नाही, तर जनतेमुळेच आम्ही आहोत. बहुमत असल्याशिवाय या देशातील चुकीचे निर्णय बदलू शकणार नाही. हुकुमशाही प्रवृत्तीच्या सत्ताधार्‍यांना जनता जोपर्यंत धडा शिकवत नाही, त्यांची जिरवत नाही, तोपर्यंत मी पाठ सोडणार नाही, असा खणखणीत इशारा काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्र पक्षांच्या आघाडीचे उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिला.
एकंबे (ता. कोरेगाव) येथे स्वाभिमानी विचार मंचने आयोजित केलेल्या प्रचारसभेत उदयनराजे बोलत होते. यावेळी सुनिल खत्री, भगवानराव जाधव, विठ्ठलराव कदम, नारायणराव फाळके, पोपट कर्पे, गणेश शेळके, दीपक शिंदे, लक्ष्मण भिलारे, अजय कदम, भारत साळुंखे, विकास शिंदे, तानाजी गोळे, अर्जुन कदम, वसंतराव जाधव, श्रीकांत चव्हाण, प्रदिप फाळके, नानासाहेब भिलारे आदी उपस्थित होते.
उदयनराजे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देशाला गांधीजींनी पंचायत राजचा विचार दिला. मात्र, गेल्या पाच वर्षांत आपण काय चित्र पाहतोय. पंचायत राज संकल्पनेविरुद्ध सत्ताधार्‍यांची वाटचाल आहे. विकेंद्रीकरणाऐवजी सत्तेचे केंद्रीकऱण झाले आहे. मन की बातद्वारे युवकांना नोकर्‍या, सामान्यांच्या खात्यावर 15 लाख जमा करण्याचे आश्वासन पाळणे लांबच राहिले. एक दिवस असेच झोपेतून उठून नोटाबंदी आणि त्यानंतर जीएसटी लागू केली. कोणत्याही परिणामांचा विचार केला नाही. मतदान करणार्‍या लोकशाहीतील मतदार राजाचा गळा घोटला. मूठभरांना राष्ट्राची संपत्ती विकली. अशीच परिस्थिति राहिल्यास यापुढे निवडणुका देखील होणार नाहीत.
त्यामुळे आता ही हुकुमशाही घालवण्यासाठी सत्तांतराशिवाय गत्यंतर नाही. मवोटींगफच्या दिवशी आऊटींगला न जाता देशातील परिवर्तनासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्र पक्ष आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतदान करा.यावेळी सुनील खत्री, विठ्ठलराव कदम, बी. एस. चव्हाण, प्रदीप फाळके, लक्ष्मण भिलारे, गणेश शेळके यांची भाषणे झाली.