आय लव्ह यू म्हणणार्‍या उदयनराजेंचा आजीबाईंनी घेतला मुका

सातारा : खासदार उदयनराजे भोसलेंची राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप उमेदवारी निश्चित नाही. मात्र, त्यांनी आपल्या संपर्क दौर्‍याला सुरुवात केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांच्या याबाबत माहिती दिली आहे. उदयनराजेंनी बुधवारी सातारा लोकसभा मतदारसंघातील जावळीतून आपल्या संपर्क दौर्‍याला सुरुवात केली आहे. या दौर्‍यातला उदयनराजेचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. तर, या दौर्‍यामुळे राजेंनी जणू लोकसभेचं रणशिंगच फुंकल्याचं बोललं जात आहे. उदयनराजे आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांशी असलेल्या जवळीकतेनही परिचीत आहेत. सामान्य लोकांसमवेत कुठेही बसणे, गप्पा मारणे, चर्चा करणे ही त्यांची खास वैशिष्टे. शेतीच्या बांधावर बसण्यापासून ते राजसिंहासनावर बसणारा राजा अशी त्यांनी ओळख आहे. उदयनराजेंची हीच ओळख पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. उदयनराजेंनी आपला संपर्क दौरा सुरू केला असून बुधवारी जावळी तालुक्यात भेटी दिल्या. त्यावेळी, ज्येष्ठांपासून ते बालकांपर्यंत त्यांनी अनेकांशी संवाद साधला. या दौर्‍यात एका आजीबाईंनी चक्क मुका घेऊन उदयराजेंना दाद दिली. दरवेळी, आपल्या कार्यकर्त्यांना आय लव्ह यू म्हणणारे आणि कधीकधी कार्यकर्त्यांचा मुका घेणार्‍या उदयनराजेंचा हा मुका म्हणजे थोरांचे आशीर्वाद व प्रेम आहे. वडिलधार्‍या, वयस्कर लोकांचे मिळणारे आशीर्वाद व प्रेम जनतेसाठी अविरत काम करण्याची ताकद देते, असे ट्विट करत उदयनराजेंनी हा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.