शासकीय सेवा संवर्गातील सेवकांना क-1 या श्रेणीमध्ये पदोन्नती द्यावी : खा.उदयनराजे

सातारा : महाराष्ट्र राज्य नगरपालिका कर निर्धारक आणि प्रशासकीय सेवा संवर्गातील सातारा जिल्हयातील सेवकांना क-2 या श्रेणीमधुन क-1 या श्रेणीमध्ये पदोन्नती द्यावी या बाबत आज सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी क-2 च्या सातारा जिल्हयातील सर्व सेवकांसमवेत, सातारचे जिल्हाधिकारी अश्‍विन मुदगल यांना निवेदन देवून लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी मागणी केली. यावर जिल्हाधिकारी यांनी पदोन्नती देण्याचे अधिकार मला असल्याने, शक्य तितक्या लवकर पदोन्नती देण्याची कार्यवाही करतो असे आश्‍वासन दिले.
नगरपरिषदा कर निर्धारण आणि प्रशासकीय सेवा राज्य संवर्ग क-2 मध्ये सन2008 पासून ते सन 2010 पर्यंत समावेशन झालेले एकूण 20 सेवक कर्मचारी सातारा जिल्हयामध्ये आहेत. त्यांची सेवाजेष्ठता यादीही तयार करण्यात आलेली आहे. तसेच या कर्मचा-यांना क-1 मध्ये पदोन्नती देण्याचे अधिकार राज्य शासनाने जिल्हाधिकारी यांना दिलेले आहेत. सातारा जिल्हयातील विविध नगरपरिषदांमध्ये आणि नगरपंचायती मध्ये क -1 या संवर्गातील एकूण 18 पदे आहेत, त्यामुळे पदोन्नती रोस्टर तयार करुन, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मंजूर करण्यात आल्यावर, पदोन्नती समितीची सभा बोलावून, पदोन्नती सभेच्या अहवालानुसार पदोन्नती देण्याबाबत जिल्हाधिकारी सक्षम आहेत. अशा पदोन्नत्या अमरावतीचे जिल्हाधिकारी यांनी नुकत्याच दिलेल्या आहेत. तसेच सातारा जिल्हयातील प्रशासकीय सेवा सवर्गातील काही कर्मचारी सेवानिवृत्तीकडे झुकलेले असल्याने, याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येवून, संवर्ग समावेशन झालेल्या सेवकांना न्याय द्यावा अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी संवर्ग सेवकांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना केली.