उध्दव ठाकरेंच्या समोर वाकेश्‍वर ग्रामस्थांचा टाहो

वडूज : वाकेश्‍वर गावाला जोडणार्‍या रस्त्याची दुरावस्था, थकीत ऊस बिलाचा प्रश्‍न व इतर समस्यांबाबत वाकेश्‍वर (ता. खटाव) येथील ग्रामस्थांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्यासमोर टाहो फोडत विविध मागण्यांची निवेदने सादर केली.
कातरखटाव येथील दौरा पुर्ण करुन श्री. ठाकरे हे खटाव येथील आ. महेशदादा शिंदे यांच्या निवासस्थानी जात असताना वाकेश्‍वर फाट्यावर ग्रामस्थांनी त्यांचे उस्फुर्त स्वागत केले. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यकत्यांनी वडूज-पुसेगांव रस्त्याला जोडणार्‍या पोहोच रस्त्याची दुरावस्था, वाकेश्‍वर – सिध्दश्‍वर कुरोली, नायकाचीवाडी रस्त्याला जोडण्यासाठी येरळा नदीवर पुल नसल्याने शेतकरी व वाहन धारकांची होत असलेली गैरसोय. तसेच रायगांव ता. कडेगांव येथील केन अ‍ॅग्रो साखर कारखान्याकडून ऊस बिलासंदर्भात होत असलेली अडवणूक याबाबत सविस्तर निवेदन दिले. यावेळी शिवडी नाका प्रमुख महेश फडतरे, जेष्ठ कार्यकर्ते कुंडलिक फडतरे, गंगाराम फडतरे, संदिप दळवी, चंद्रकांत फडतरे, शशिकांत फडतरे, विलास फडतरे, नानासाहेब फडतरे, राजू फडतरे, बापूराव निकम, दुर्योधन धुमाळ, दिलीप फडतरे आदी उपस्थित होते.
धनंजय क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत करण्याबरोबर मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छाही दिल्या.