अभिरुप बाजारामुळे विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान वाढीस मदत : दादासाहेब गोडसे

वडूज: शालेय विद्यार्थ्यांचे व्यवहारज्ञान वाढण्यामध्ये अभिरुप बाजाराचा फायदा होईल असे मत छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे यांनी केले.
संस्थेच्या शिवाजी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या पटांगणावर आयोजित केलेल्या आठवडा बाजाराचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रशासन अधिकारी प्राचार्य आर. एन. घाडगे, प्राचार्य सी. आर. गोडसे, प्राचार्य डॉ. एल.जी.जाधव, मुख्याध्यापिका शुभांगी देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. गोडसे म्हणाले, लहान मुलांमध्ये जिज्ञासा व चिकाटी हे दोन चांगले गुण असतात. बाजारासारख्या उपक्रमामुळे त्यांच्या या कलागुणांमध्ये वाढ होण्यास चांगली मदत होणार आहे. शाळेच्या वतीने चिमुकल्यांसाठी राबविण्यात येणारे वेगवेगळे उपक्रम कौतुकास्पद आहेत. या उपक्रमास पालकांच्याकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही अतिशय समाधानाची बाब आहे. शिवाजी प्राथमिक शाळेमुळे परिसरातील मुलांची चांगली मजबूत पायाभरणी होत आहे.
यावेळी त्यांनी स्वत: बाजारातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या दुकानासमोर जावून माहिती घेण्याबरोबर चिमुकल्यांचे कौतुक केले.
दरम्यान लहान मुलांनी सकाळी सकाळी गोळा केलेल्या ताज्या भाज्या, फळे तसेच इतर खाद्यपदार्थांची दोन तासात हातोहात विक्री झाली. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षक समीर इंगळे, सागर शिंदे, कल्पना गोडसे, सरिता चव्हाण, विद्या राऊत, रोहिणी कोळी, श्री. कुलकर्णी तसेच शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.