फलटणमध्ये ऐन उखाड्यात विजेचा लपंडाव नागरिक हैराण

फलटण : सध्या असह्य होणारे ऊन, उकाड्यामुळे अंगाची लाही लाही होत असताना विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने फलटण तालुक्यातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळ्यापूर्वी महावितरणने वीज वितरण व्यवस्थेच्या दुरूस्तीची कामे करून घ्यावीत, अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहेत. तर तांत्रिक बिघाड झाल्यास वीज पुरवठा खंडित होत असल्याचे महावितरणच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.
फलटण तालुक्यात तसेच मुख्यतः फलटण शहरात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार नवीन नसून गेले काही दिवस पुन्हा खेळखंडोबा सुरू झाला असून वीज गुल होत असल्याने उन्हाळ्यात लोकांचे हाल होत आहेत. शहरात वीजग्राहकांना कुठलीही पूर्वसूचना न देता दिवसभरात वारंवार वीजपुरवठा खंडित करण्याचे प्रकार वीज वितरण कंपनीकडून सुरू आहेत. सतत घडणार्‍या या प्रकारांमुळे फलटणकर हैराण झाले आहेत. कुठलेही कारण नसताना शहराच्या विविध भागात सर्रासपणे वीजप्रवाह वारंवार खंडित करण्यात येत असल्याचा नागरिकांसह व्यावसायिकांनाही फटका बसत आहे. काही भागात दुपारच्या वेळी उकाड्याचा सामना करावा लागत असून, व्यावसायिक व नागरिकांची नित्योपयोगाची उपकरणे खराब होत असल्याने ते त्रस्त झाले आहेत. दिवसा अथवा रात्रीदेखील कोणत्याही वेळेस अचानक वीजपुरवठा बंद करण्यात येत आहे.वीज वितरण व्यवस्थेच्या देखभाल दुरूस्तीसाठी आठवड्यातून एकदा मंगळवारी वीज पुरवठा खंडित केला जातो असे असताना देखील ईतर दिवशीही वीज पुरवठा खंडित केला जात आहे. या प्रकारामुळे नागरिक थेट महाराष्ट्र वीज वितरण कंपनीला लाखोल्या वाहत आहेत. महावितरणच्या कार्यालयांमधून नागरिकांना योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने लोकांच्या संतापात अधिक भर पडत आहे.
इनर्व्हटर कंपन्यांचा व्यवसाय व्हावा म्हणून सतत वीज पुरवठा खंडित होतो का, असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. ऊन्हाळ्यात वीज पुरवठ्याची ही अवस्था असेल तर पावसाळ्यात काय होणार, असा प्रश्न नागरिक करत आहेत. मान्सूनपूर्व कामे महावितरणने आत्ताच करायला हवीत असे लोक सांगत आहेत. वीज तारांजवळची वृक्ष फांद्यांची छाटणी, ट्रॉन्स्फॉर्मर देखभाल दुरूस्तीची कामे आत्ता सुरू करण्याची गरज आहे. या प्रकाराची वीज वितरण कंपनीने गंभीर दाखल घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.