किसनवीरच्या मदतीने विखळ्याचे चित्र बदलेलः आप्पासो मतकर

कोरेगांव : कोरेगांव तालुक्यातील उत्तर भागात दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍नाबरोबर आमची शेती प्रतिकुल परिस्थितीतुन जात आहे. या कठीण दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्ही विखळे ग्रामस्थ सज्ज झालो असून किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी कारखान्याच्या माध्यमातुन जलसंधारण कामांसाठी केलेल्या अमुल्य मदतीमुळे गावच्या जलसंधारणाच्या कामाला वेग आला असून त्यांच्या सहकार्यामुळे विखळे गावचे दुष्काळाचे चित्र नक्कीच बदलेल, असा विश्‍वास विखळे गावचे सरपंच आप्पासोा मतकर यांनी व्यक्त केला.
किसन वीर साखर कारखाना व्यवस्थापनाने कार्यक्षेत्रातील दुष्काळ व पाणी टंचाईचा सामना करणार्‍या गावातील जलसंधारणाच्या कामांसाठी सामाजिक बांधिलकीतुन पोकलेन मशिन दिलेले आहे. विखळे (ता. कोरेगांव) येथील मळवीचा ओढा रूंदीकरण, खोलीकरण व इतर जलसंधारण कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी किसन वीर कारखान्याचे संचालक नंदकुमार निकम, सचिन सांळुखे, विजय चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
कारखान्याचे संचालक विजय चव्हाण म्हणाले, किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले हे शेतकरी हिताचे धोरण डोळ्यासमोर ठेवून काम करित आहेत. त्यांच्या कल्पक नेतृत्वाखाली कारखान्याचे संचालक आणि व्यवस्थापनाने कार्यक्षेत्रातील गावांसाठी नेहमीच सहकार्याची भुमिका घेतलेली आहे. या मदतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.
प्रारंभी रविंद्र मतकर आणि शिवाजी निकम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन कामांचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी संचालक नंदकुमार निकम, सचिन सांळुखे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास डॉ. दत्तात्रय फाळके, प्रमोद मतकर, सुधीर अडागळे, विष्णू माळी, जिन्नस मतकर, शिवराज अहिरेकर, संजय मतकर, रतन अहिरेकर, संतोष अहिरेकर, दशरथ जाधव, शिवाजी अहिरेकर, वसंत अहिरेकर यांच्यासह गावातील विविध संस्थाचे पदाधिकारी, संचालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.